अहमदनगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या लता शेळके
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 02:03 PM2019-03-04T14:03:49+5:302019-03-04T15:09:20+5:30
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी केडगाव भागातून निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेविका लता शेळके यांची बिनविरोध निवड झाली.
अहमदनगर - महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी केडगाव भागातून निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेविका लता शेळके यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी शिवसेनेच्या सुवर्णा गेनप्पा यांचा एकमेव अर्ज दाखल केला होता. या एकमेव समितीमध्ये सेनेमागे पाठबळ नसल्याने भाजपा-शिवसेनेची युती पहायला मिळाली. या निमित्ताने केडगाव भागाला सभापतीपदाची प्रथमच संधी मिळाली.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी भाजपाच्या लता शेळके यांनी तर शिवसेनेच्या पुष्पा बोरुडे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र बोरुडे यांनी अर्ज मागे घेतल्याने शेळके बिनविरोध निवडून आल्या. उपसभापतीपदासाठी सुवर्णा गेनप्पा यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांचीबी निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यामुळे या समितीवर भाजप-शिवसेना यांची युती झाल्याचे दिसून आले आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्याने महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेने माघार घेतली. अखेर राज्यात युती झाली असली तरी महापालिकेत मात्र युती पहायला मिळाली नाही. महापौर निवडणुकीमध्ये ठरलेल्या सूत्रानुसार पदे दिल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत. आगामी काळात युतीचा विचार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.