भाजपाच्या राज्यात भाजपाचेच आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 06:51 PM2017-10-06T18:51:09+5:302017-10-06T18:55:12+5:30
शहरातील वाढत्या भारनियनाविरोधात सत्ताधारी भाजपावरही आंदोलनाची वेळ आली. भारनियमनच्या चुकीच्या वेळेमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी भाजपा पदाधिका-यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्याकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरातील वाढत्या भारनियनाविरोधात सत्ताधारी भाजपावरही आंदोलनाची वेळ आली. भारनियमनच्या चुकीच्या वेळेमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी भाजपा पदाधिका-यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्याकडे केली.
उपमहापौर श्रीपाद छिंदम, गटनेते सुवेंद्र गांधी, शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवाले, मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपाने शुक्रवारी सकाळी महावितरण कार्यालयात अभियंता बोरसे यांना निवेदन दिले. सत्ताधारी पक्षाचे असल्याने इतर पक्षांसारखे आंदोलन करून अधिका-यांना धमक्या देणार नाही. मात्र, जनतेच्या भावना आणि मागण्या आम्हाला मांडाव्याच लागतील, अशी भूमिकाही भाजप पदाधिका-यांनी घेतली.
भारनियमनमुळे वसंत टेकडी येथील पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. इतर जिल्ह्यात २ ते ३ तास तर नगरमध्ये ८ तास भारनियमन का? असा सवाल यावेळी करण्यात आला. महावितरणकडून नियोजन नसल्याचा आरोप सुवेंद्र गांधी यांनी केला. एकीकडे पंतप्रधान प्रत्येक घराघरात वीज पोहोचवण्यासाठी आग्रही असतांना दुसरीकडे भारनियमन सुरू असल्याने आम्ही जनतेला काय उत्तर देणार? अशा शब्दांत नरेंद्र कुलकर्णी यांनी व्यथा मांडल्या.
दरम्यान, अधिक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी भारनियमनामागील भूमिका स्पष्ट केली. गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने विजेचा तुटवडा भासत आहे. आणखी दोन दिवस अडचणीचा सामना करावाच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीसाठी शहरात भारनियमन रद्द करणार असल्याचे आश्वासन बोरसे यांनी दिले.
यावेळी भाजपाचे प्रशांत मुथा, सागर गोरे, रोहन डागवाले, मंगेश निसळ, मिलिंद भालसिंग, राहुल रासकर, भरत ठुबे, नितीन जोशी, आलीस सय्यद, अविनाश सकला, अभिषेक दायमा, सागर कारले, अज्जू शेख, संदीप ढाकणे, सजित खरमाळे, रोषण गांधी, नरेश चव्हाण उपस्थित होते.
- बावनकुळेंचे आश्वासन ?
- आंदोलनावेळी सुवेंद्र गांधी यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र बावनकुळे यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर बावनकुळे यांनी गांधी यांना संपर्क करुन लवकरच भारनियमन बंद केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.