शिंदे, विखे, कोल्हे, पाचपुतेंसह चार विद्यमान आमदारांना भाजपची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:20 PM2019-10-01T13:20:58+5:302019-10-01T13:33:03+5:30
पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. या यादीत जिल्ह्यातील भाजपच्या सर्व विद्यमान आमदारसह माजीमंत्री बबनराव पाचपुते, वैभव पिचड यांचा समावेश आहे.
अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. या यादीत जिल्ह्यातील भाजपच्या सर्व विद्यमान आमदारांसह माजीमंत्री बबनराव पाचपुते, वैभव पिचड यांचा समावेश आहे.
गेल्या दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीबाबत चर्चा होती. दरम्यान मंगळवारी भाजपने दिल्लीतून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात भाजपने जिल्ह्यातील विद्यमान पाचही आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमधून आलेले मंत्री राधाकृष्ण विखे यांना शिर्डीतून तर राष्टÑवादीतून आलेले आमदार वैभव पिचड यांना अकोलेतून उमेदवारी दिली आहे. याशिवाय श्रीगोंद्यातून माजीमंत्री पाचपुते यांना पुन्हा संधी दिली आहे. कर्जत-जामखेडमधून पालकमंत्री राम शिंदे, शेवगाव-पाथर्डीतून मोनिका राजळे, कोपरगावमधून स्रेहलता कोल्हे, राहुरीतून शिवाजीराव कर्डिले, नेवाशातून बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातून सेना-भाजपकडून अद्याप उमेदवार दिला गेला नाही.