जळगावमध्ये धनशक्तीमुळे भाजपाचा विजय : सहकारमंत्री गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 05:02 PM2018-08-06T17:02:11+5:302018-08-06T17:03:00+5:30
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळेल असे वाटत होते. मात्र ऐनवेळी मनसेचे महापौर भाजपात गेले.
शिर्डी : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळेल असे वाटत होते. मात्र ऐनवेळी मनसेचे महापौर भाजपात गेले. सुरेशदादा जैन जॉईन झाले. ऐनवेळी झालेली गद्दारी व निवडणुकीत धनशक्तीचा झालेला वापरामुळे निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिर्डीत सांगितले़ साईदर्शनानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला़
पाटील म्हणाले, आमचा पराभव आम्ही स्विकारला. आता चांगल्या कामात त्यांना मदत करु. जिथे शहराच नुकसान होईल तिथे विरोध करणार. ही निवडणुक काही दिल्लीची निवडणुक नव्हती. ही निवडणुक गटर, वॉटर आणि मीटरची होती़ राम मंदीर यही बनायेगे, तारीख नही बतायेगे अशी ही निवडणुक नव्हती़ त्यामुळे स्थानिक प्रश्नावर जनतेने भाजपाला कौल दिला आहे़ राष्ट्रवादी तर खातेही खोलु शकली नाही. मात्र शिवसेनेचे पंधरा नगरसेवक निवडुन आल. आम्ही बळजबरीने भाजपा मागे जात नाहीत. आम्ही एकटे लढायचा निर्णय घेतलाही आणि लढलोही. सांगली निवडणुकीत आम्ही भाजपाशी युती करून लढलो असतो तर आमच्याही जागा आल्या असत्या. मात्र आम्ही जळगाव आणि सांगली येथे स्वबळावर लढलो. खडसे व महाजनांमध्ये कोण प्रभावी ठरले, या प्रश्नावर बोलतांना पाटील म्हणाले, खडसेंनी आपले ४० वर्षे भाजपामध्ये घातले आहे़ गिरीश महाजन यांना जेव्हापासून राजकारण कळायला लागले तेव्हापासून ते भाजपात आहेत़ त्यांच्यात वरचढ कोण आहे हे त्यांनीच समजून घ्यावे़ आम्हाला दोघेही सारखेच दिसतात़ हिना गावित यांच्यावर करण्यात आलेला हल्ला दुर्देवी असून आंदोलकांनी सयंम बाळगावा, असे आवाहनही पाटील यांनी केले़