कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे काळे- कोल्हेची नाचक्की !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:20 AM2021-01-23T04:20:36+5:302021-01-23T04:20:36+5:30
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील १७ सदस्य असलेली सर्वात मोठी संवत्सर ग्रामपंचायत आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांचे हे ...
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील १७ सदस्य असलेली सर्वात मोठी संवत्सर ग्रामपंचायत आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांचे हे गावच असल्याने या ग्रामपंचायतीवर त्यांचीच गेल्या अनेक वर्षाची निर्विवाद सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत हि सत्ता मोडीत काढण्यासाठी तालुक्याचे मात्तबर नेते काळे व कोल्हे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांनुसार परजणे यांच्या पॅनलच्या विरोधात सर्वच १७ जागांवर आपले उमेदवार उभे करून तिरंगी लढत दिली. मात्र, गावच्या मतदारांनी पुन्हा एकदा राजेश परजणे गटाला सर्वाधिक १४ जागा देत कोल्हे गटाला यांना २ तर काळे गटाला यांना फक्त एक जागा दिली आहे. त्यामुळे उत्साही कार्यकर्त्यांच्या भरवशावर निवडणूक लढवून या दोनही नेत्यांना नाचक्कीला समोरे जावे लागले असल्याचे चित्र या निकालातून स्पष्ट झाले आहे.
कोपरगाव तालुक्याच्या राजकारणात कोल्हे गट, काळे गट व परजणे गट याचे सहकाराबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेत बोलबाला आहे. सहकार वगळता इतर सर्वच निवडणुकीत हि मंडळी एकमेकांच्या बरोबर तर कधी विरोधात आसतात. परंतु, एवढ्या दिवसांच्या तालुक्याच्या राजकारणात राजेश परजणे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणूका वगळता कधीच आमदारकी लढविली नव्हती. त्यामुळे आमदारकीची लढत सरळ काळे- कोल्हे यांच्यात होत. परंतु २०१९ ला परजणे यांनी अपक्ष आमदारकीची निवडणूक लढविली. त्यामुळे तालुक्यात चांगलीच राजकीय उलथापालथ झाली होती.
त्यामुळे या दोनही नेत्यांचे स्थानिक कार्यकर्ते आगामी ग्रामपंचायत डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागले. त्यानुसार दोन्ही नेतेही याकडे गांभीर्याने बघायला लागले होते. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत परजणे यांची सत्ता मोडीतच काढायची आणि आपलाच झेंडा रोवायचा अशी स्थानिक कार्यकर्त्याच्या भरंवशावर दोनही नेत्यांची रणनीती ठरली होती. दोनही नेत्यांनी परजणेंच्या विरोधात सर्वच जागेंवर आपले उमेदवार उभे केले. विशेष म्हणजे राजेश परजणे यांची कोंडी करण्यासाठी त्यांचे पुतणे असलेले विवेके परजणे यांच्याविरोधात काळे यांनी त्यांच्या कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते व कोल्हे यांनी त्यांच्या कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. जसजसा प्रचार रंगात येऊ लागला तसतसा स्थानिक कार्यकर्त्यांचा अतिआत्मविश्वास नेत्यांना आस्वस्थ करू लागला. या गदारोळात धूर्त व अभ्यासू राजकारणी म्हणून ओळख असलेले कोल्हे यांनी मात्र, आपल्या कार्यकर्त्यांना सरळ सांगून टाकले. आम्ही गावात एकदाही प्रचाराला येणार नाही. तुम्हाला काय लागते ते सांगा ते पोहच होईल. मात्र, काही झाले तरी निवडणूक जिंकायचीच असे सांगितले. याउलट काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी काही झाले तरी सत्ता आपलीच येणार असे आश्वासन देत आमदार आशुतोष काळे यांना ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार करण्यास भाग पाडले. त्यानुसार आमदार काळे यांनी गावात दोन ते तीन वेळा येत प्रचार केला. आमदारांनी ग्रामपंचायतीच्या वार्डात प्रचार करूनही मतदारांनी त्यांना सपशेल नाकारत फक्त १ जागा विजयी करून दिली. तर कोल्हे यांनी एकदाही गावात न येता किमान दोन जागा विजयी करून दिल्या.
त्यामुळे पुन्हा एकदा मतदारांनी मोठ्या फरकाने त्यांचे स्थानिक नेते राजेश परजणे यांच्याकडेच ३१ वर्षांच्या परंपरेनुसार सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. त्यामुळे तालुक्याचे राजकरण करणाऱ्या नेते मंडळींनी गावच्या अतिउत्साही कार्यकर्त्यामुळे उगाचच गाव पातळीवरील निवडणुकीत लक्ष घालून आपल्या वैचारिक प्रगल्भतेची उंची कमी करून घेतल्याची चर्चा या निकालानंतर तालुक्यात सुरु आहे.
.........
हे मातब्बर झाले पराभूत
कोल्हे कारखान्याचे विद्यमान संचालक ज्ञानेश्वर परजणे, काळे कारखान्याचे विद्यमान संचालक बाळासाहेब बारहाते, माजी ग्रामपंचात सदस्य बापूसाहेब बारहाते हे मोठ्या फरकाने पराभूत झाले आहेत.