भिंगारमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:43+5:302021-04-14T04:18:43+5:30
पोलिसांनी फार्मासिस्ट प्रसाद दत्तात्रेय आल्हाट (वय २७, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) व रोहित अर्जुन पवार (वय २२, ...
पोलिसांनी फार्मासिस्ट प्रसाद दत्तात्रेय आल्हाट (वय २७, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) व रोहित अर्जुन पवार (वय २२, रा. साकत, ता.नगर) यांना अटक केली आहे. तर म्हस्के हॉस्पिटलचे संचालक डॉ. कौशल्या किशोर म्हस्के व डॉ. किशोर दत्तात्रय म्हस्के (दोघे रा. वडारवाडी, भिंगार) हे फरार झाले आहेत. याप्रकरणी औषध निरीक्षक जावेद हुसेन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हस्के हॉस्पिटल येथील कोविड सेंटरमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती भिंगार पोलिसांना मिळाली होती. माहितीनुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस नाईक राजू सुद्रिक, अडसूळ, मोरे, तावरे यांच्या पथकाने छापा टाकला. त्यानंतर याबाबत अन्न, औषध प्रशासन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी पोलिसांनी इंजेक्शनचा साठा, एक मोबाईल, एक मोटरसायकल तसेच प्रसाद अल्हाट याच्या ताब्यातील १ लाख २ हजार ६०० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
...............
४८०० रुपयांचे इंजेक्शन विकत होते १२ हजाराला
म्हस्के हॉस्पिटल येथे कोविड सेंटर आहे. या हॉस्पिटलमधील चैतन्य मेडिकलमधून प्रसाद आल्हाट व रोहित पवार हे डॉ. किशोर म्हस्के व डॉ कौशल्या म्हस्के यांच्याशी संगनमत करून कोरोनाचा अहवाल न पाहता तसेच प्रिस्क्रिप्शन विना रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजारातून बारा हजार रुपयांना विकत होते. या इंजेक्शनची मूळ किंमत ही ४ हजार ८०० रुपये इतकी आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर संगनमताने सुरू असलेल्या या काळ्याबाजाराचा भंडाफोड झाला असून त्यांनी याआधी असे किती इंजेक्शन विकले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.