अकोलेत अवतरली ‘काळी मिरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:27 PM2020-02-16T13:27:49+5:302020-02-16T13:28:20+5:30
अकोले तालुक्यात चक्क ‘काळी मिरी’ या मसाले पिकाची लागवड करण्यात येत आहे. कृषी विभागाने आदिवासी दुर्गम भागात किमया साधली आहे. सध्या २२ युवा शेतकºयांच्या शेतात चार फुटांची ६२३ रोपे डोलताना दिसत आहेत.
मच्छिंद्र देशमुख ।
कोतूळ : अकोले तालुक्यात चक्क ‘काळी मिरी’ या मसाले पिकाची लागवड करण्यात येत आहे. कृषी विभागाने आदिवासी दुर्गम भागात किमया साधली आहे. सध्या २२ युवा शेतक-यांच्या शेतात चार फुटांची ६२३ रोपे डोलताना दिसत आहेत.
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात ८० टक्के जंगलाचा प्रदेश आहे. शिवाय ही जंगले बहुतांश सदाहरित वृक्ष आहेत. शिवाय तालुक्यात आदिवासी भागात शेतीला मर्यादित संधी आहे. केवळ भात, वरई, नाचणी ही प्रमुख पिके आहेत. कोकणातील पिकणाºया मिरी पिकासाठी अकोलेतील वातावरण योग्य असल्याने तालुका कृषी विभागाने आत्माअंतर्गत धामणवन येथील २२ युवा शेतकºयांचा परिवर्तन सेंद्रिय उत्पादक गट स्थापन केला. रत्नागिरी जिल्ह्यातील हातखांब्यातून पहिल्यांदा एक वर्षापूर्वी २४ मिरी रोपे आणून लागवड केली. योग्य वाढ झाल्याचे दिसून येताच यंदा आॅगस्टमध्ये आणखी सहाशे रोपांची लागवड केली. सध्या ही रोपे चार फूट उंचीची आहेत. मिरी पिकाला फळ येण्याचा कालावधी दोन वर्षांचा असल्याने पुढील वर्षी प्रत्यक्ष फळे येणार आहेत.
ही योजना यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, मंडळ अधिकारी भाऊसाहेब बांबळे, आत्माचे बाळनाथ सोनवणे, शरद लोहकरे, यशवंत खोकले, भगवान वाकचौरे, आर.सी. पाडवी, विठ्ठल चव्हाण, मंगल ठोकळ प्रयत्न करत आहेत. अकोले तालुक्यातील आदिवासी शेतक-यांना सक्षम रोजगार, मिरी फळाची परदेशातून आयात करावी लागते. हे पीक झाडांच्या सावलीत येते ते वाढताना झाडाचा आधार घेते. त्यामुळे आदिवासी भागात हे खात्रीने येणार आहे. या पिकाचे सर्व नियोजन शेतक-यांमार्फत कृषी विभागाच्या सल्ल्याने सुरू आहे, असे अकोले तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी सांगितले.