हाती कोऱ्याच पावत्या; बळीराजाने टोमॅटोच्या शेतात सोडल्या शेळ्या अन् मेंढ्या
By शेखर पानसरे | Published: December 24, 2022 04:16 PM2022-12-24T16:16:29+5:302022-12-24T16:20:54+5:30
टोमॅटो पिकासाठी एकरी साधारण सव्वा लाख रूपये खर्च येतो. परंतू सध्या टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर हाती रुपयादेखील शिल्लक राहत नाही
संगमनेर : शेतात माल पिकवणं शेतकऱ्याच्या हातात आहे, पण बाजारात विकणं हे शेतकऱ्याच्या हातात नाही. त्यामुळेच, अनेकदा शेती मालाला भाव न मिळाल्याने बळीराजाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा लाल चिखल केल्याचं आपण पाहिलंय. काहींना बाजारात चक्क फुकट टमाटे वाटल्याचं दिसून दिसून आलंय. आता संगमनेर येथील एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाला भाव मिळत नसल्याने चक्क शेतात मेंढ्या-शेळ्या सोडल्या आहेत. हतबल झालेल्या या बळीराजाची करुण कहानी अनेकांचे डोळे पाणावणारीच आहे.
टोमॅटो पिकासाठी एकरी साधारण सव्वा लाख रूपये खर्च येतो. परंतू सध्या टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर हाती रुपयादेखील शिल्लक राहत नाही. बाजार समितीमध्ये, बाजारात टोमॅटो विक्रीसाठी नेले असता घरातून पैसे घालण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आल्याने संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील शेतकरी शशिकांत विठ्ठल कढणे यांनी त्यांच्या टोमॅटोच्या शेतात मेंढ्या आणि शेळ्या सोडल्या आहेत.
शेतकरी शशिकांत कढणे यांनी सांगितले की, टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो हे बाजार समिती, बाजारात विक्रीला नेण्यासाठी गाडीचे भाडे सुद्धा खिशातून घालण्याची वेळ आली आहे. टोमॅटो रोप, शेतीची मशागत, मल्चिंग पेपर, ठिबक, खते, औषधे, मजूरी, मंडप बांधण्यासाठी (बांधणी) लागणारी तार, बांबू, सुतळी आणि टोमॅटो काढणी अशा एकूण खर्चाचा विचार केला असता तो एकरी साधारण सव्वा लाख रुपये इतका होतोच. एवढा खर्च होऊनही सध्या बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी नेल्यानंतर हाती कोऱ्या पावत्यांचे शिवाय काहीही पडत नाही.