केंद्र सरकारविरोधात नगरमध्ये रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:22 AM2021-03-27T04:22:03+5:302021-03-27T04:22:03+5:30
अहमदनगर : येथील जिल्हा शेतकरी कामगार संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व ...
अहमदनगर : येथील जिल्हा शेतकरी कामगार संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व केंद्र सरकारच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.२६) सकाळी मार्केट यार्डजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने आणि रास्ता रोको करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीका करीत मोदी सरकार शेतकऱ्यांना हमी भाव का देत नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भ्रष्टाचारविरोधी जनांदोलनाचे अशोक सब्बन, विकास गेरंगे, महेबूब सय्यद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सबका साथ सबका विकास करू म्हणणारे मोदी सरकार देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून केवळ अदानी-अंबानी सारख्या भांडवलदारांचाच विकास करीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान हमीभाव मिळालाच पाहिजे, ही मागणी ते का मान्य करत नाहीत? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते आणि पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला.
आंदोलनात जैद शेख, गणेश आढाव, महादेव घोडेस्वार, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, अश्विन शेळके, सूचिता शेळके, गंगाधर त्रिंबके, विडी कामगार नेत्या भारती न्यालपेल्ली, प्रकाश भराठे, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. कॉ. सुधीर टोकेकर आदी सहभागी झाले होते.
आंदोलनासाठी अंबादास दौंड, भिल्ल समाज संघटनेचे सुनील ठाकरे, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे सतीश निमसे, दीपकराव शिरसाठ, फिरोज चाँद शेख, भिल्ल आदिवासी नेते चंद्रकांत माळी, संतोष गायकवाड, कामगार संघटना महासंघाचे रामदास वागस्कर, युथ फेडरेशनचे कार्तिक पासलकर, किसान सभेचे विजय केदारे, भाकपचे भैरवनाथ वाकळे आदींनी परिश्रम घेतले.
...........................
२६ नगर आंदोलन