अर्धवट कामामुळे नगर-सोलापूर बायपासवर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:22 AM2021-02-09T04:22:52+5:302021-02-09T04:22:52+5:30
निंबळक : नगर तालुक्यातील वाळुंज शिवारातील नगर-सोलापूर बायपासचे अर्धवट अवस्थेतील काम मार्गी न लावल्यामुळे बाजार समितीचे उपसभापती संतोष ...
निंबळक : नगर तालुक्यातील वाळुंज शिवारातील नगर-सोलापूर बायपासचे अर्धवट अवस्थेतील काम मार्गी न लावल्यामुळे बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी नऊ वाजता गावातच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पंधरा दिवसांच्या आत या रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास बांधकाम विभागाच्या कार्यालयात आत्मदहन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यावर वरिष्ठांशी चर्चा करून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीचा निधी इतर योजनेतून मिळविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन बांधकाम विभागाचे डी. एच. बांगर यांनी दिले.
नगर-सोलापूर महामार्गाच्या बायपासचे वाळुंज परिसरात आठ वर्षांपूर्वी काम झाले होते. मात्र नेमके गावाजवळील एक किमीचे काम संबंधित ठेकेदाराने अपूर्ण ठेवले. त्यामुळे परिसरातील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. अवजड वाहतूक असल्याने धुळीचे प्रमाणही माेठे आहे. ही धूळ रस्त्याच्याजवळ असलेल्या पिकांवर बसत आहे. त्यामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन. मात्र काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे वाळुंज येथे रास्ता रोको केला, असे ग्रामस्थांनी सांगितले.
आंदोलनात अनिल मोरे, बाळासाहेब दरेकर, मकरंद हिंगे, सुखदेव दरेकर, तात्यासाहेब दरेकर, संदीप मोरे, नवनाथ हिंगे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
फोटो दोन आहेत
०८ वाळुंज, १
नगर-सोलापूर बायपासवरील वाळुंज परिसरातील काम अर्धवट राहिल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. दुसऱ्या छायाचित्रात वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा. (छायाचित्र : नागेश सोनवणे)