कांदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:20 AM2021-01-25T04:20:23+5:302021-01-25T04:20:23+5:30
शेवगाव : येथील बाजार समितीच्या आवारात शनिवारी कांदा लिलाव सुरू झाले असतानाच व्यापारी कमी भाव देत असल्याचे निदर्शनास आल्याने ...
शेवगाव : येथील बाजार समितीच्या आवारात शनिवारी कांदा लिलाव सुरू झाले असतानाच व्यापारी कमी भाव देत असल्याचे निदर्शनास आल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समितीच्या प्रवेशद्वारासमोरील शेवगाव-पाथर्डी राज्यमार्गावर अचानक रास्ता रोको आंदोलन केले.
शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या आंदोलनाने वाहनधारकात गोंधळ उडाला. व्यापारी व समितीचे कर्मचारी सैरभैर झाले. सचिव अविनाश म्हस्के यांनी भाव वाढून लिलाव करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
गत लिलावात शेतकऱ्यांना दिलेला भाव व त्यातून व्यापाऱ्यांना बाजारात मिळालेला भाव यामध्ये तोटा झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अशातच त्यांनी शनिवारी उशीराने कांदा लिलाव सुरू केले. सुरवातीला २ हजार ४०० रुपये क्विंटलने लिलाव सुरू होताच शेतकऱ्यांनी कमी भाव मिळत आहे, असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यात काही संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ रस्त्याकडे धाव घेतली आणि अचानक शेवगाव-पाथर्डी राज्यमार्गावर भाव वाढीसाठी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले.
बाजार समितीचे सचिव अविनाश म्हस्के यांनी आंदोलकांना नेवासा, नगर, घोडेगाव तसेच इतर कांदा मार्केटमध्ये दिलेल्या भावाप्रमाणे येथेही भाव देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांसमोर इतर मार्केटशी मोबाईलवरून भावासंदर्भात संपर्क केला. त्याप्रमाणे व्यापाऱ्यांनी संमती दर्शविली व पुन्हा लिलाव सुरू झाले.
यावेळी २ हजार ८०० रुपये भाव देण्यात आला. दरम्यान पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना या आंदोलनाची माहिती मिळताच ते पोलीस कर्मचाऱ्यांसह आंदोलनस्थळी दाखल झाले. दोन तासाहून अधिक आंदोलन सुरू होते.
फोटो : २३ शेवगाव आंदोलन
शेवगाव येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेवगाव-पाथर्डी रस्त्यावर रास्ता रोको केला.