रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:27+5:302021-04-06T04:19:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यापासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. जिल्ह्यातील बहुतांश रक्तपेढ्यांत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यापासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. जिल्ह्यातील बहुतांश रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन फक्त चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.
कोरोनापूर्वी जिल्ह्यात साखळी पद्धतीने चालणाऱ्या रक्तदान शिबिरांतून सर्वच रक्तपेढ्यांत दररोज हजारोंच्या संख्येत रक्तपिशव्या जमा होत होत्या. त्यातून रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना कधीच रक्ताचा तुटवडा भासला नाही. तसेच गैरसोयदेखील झाली नाही; परंतु कोरोनामुळे सार्वजनिकरीत्या होणाऱ्या रक्तदान शिबिरांना आधीच मर्यादा आल्या होत्या. त्यातूनही काहीसा मार्ग काढून रक्तपेढ्या रक्तसंकलनासाठी प्रयत्न करीत होत्या; परंतु लसीकरण सुरू झाल्याने रक्तसंकलनावर परिणाम झाला आहे. लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे अनेक जणांना इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही.
...................
शासकीय रक्तपेढीत सहा दिवसांचाच साठा
नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीत कोरोनापूर्वी वर्षाकाठी सुमारे सहा हजार रक्तपिशव्या उपलब्ध होत होत्या. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात त्या निम्म्यावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या या रक्तपेढीतून दररोज १५ ते २० रक्तपिशव्याची मागणी होत आहे. आता केवळ १०० रक्तपिशव्या शिल्लक असून, ते सरासरी सहा दिवसच पुरू शकेल, असे ब्लड बँक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
............
अहमदनगर ब्लड बँक
कोरोनाआधी महिन्याला ४०० रक्तपिशव्या जमा होत होत्या. कोरोनानंतर सार्वजनिक शिबिरांची संख्या घटली. त्यामुळे रक्त उपलब्ध होण्याचे प्रमाण १०० पिशव्यांवर आले. लसीकरणापासून तर रक्तदानाचे प्रमाण घटले असून, सध्या फक्त ४ ते ५ पिशव्या शिल्लक असल्याचे ब्लड बँकेच्या वतीने सांगण्यात आले.
........
जनकल्याण ब्लड बँक
कोरोनाआधी महिन्याला ६०० रक्तपिशव्या जमा होत होत्या. कोरोनानंतर रक्तदान शिबिर होत नाही. त्यामुळे रक्तपिशव्या उपलब्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. सध्या फक्त २ ते ३ पिशव्या शिल्लक असून, हा साठा एक दिवससुद्धा पुरणार नसल्याचे ब्लड बँकेच्या वतीने सांगण्यात आले.
...........
संजीवनी ब्लड बँक
कोरोनाआधी महिन्याला ३०० रक्तपिशव्या जमा होत. कोरोनानंतर रक्तदान शिबिरे कमी झाली. त्यामुळे रक्तपिशव्या उपलब्ध होण्याचे प्रमाण ५० टक्क्यावर आले. आता फक्त ५० रक्तपिशव्या शिल्लक आहेत.
..........
सामाजिक बांधिलकी म्हणून मित्र फाउंडेशन तसेच इतर माध्यमांतून गेल्या २० वर्षांपासून प्रत्येक वर्षात दोनवेळा रक्तदान शिबिरे घेऊन सुमारे ४ हजारांपेक्षा जास्त रक्तपिशव्या रक्तपेढ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सध्याचा रक्ताचा तुटवडा पाहता तरुणांसह नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तपेढ्यांत जाऊन रक्तदान करावे.
- वैभव आढाव, अध्यक्ष, मित्र फाउंडेशन, कोपरगाव