जामखेड, खर्डा येथे महाराष्ट्र दिनी ४९० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:46+5:302021-05-05T04:33:46+5:30
जामखेड : पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी ‘माझे जामखेड माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून सध्याच्या कोरोना काळात रक्ताची गरज ओळखून ...
जामखेड : पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी ‘माझे जामखेड माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून सध्याच्या कोरोना काळात रक्ताची गरज ओळखून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एकाच वेळी जामखेड व खर्डा येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यास जामखेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ४९० जणांनी रक्तदान केले.
शहरातील महावीर मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, राष्ट्रवादीचे सूर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण ढेपे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, सचिन भंडारी, सुनील अनभुले आदी उपस्थित होते.
संभाजी गायकवाड म्हणाले, रक्त पिशव्यांचा साठा काही दिवसापुरताच शिल्लक आहे रक्त अभावी रूग्ण दगावली आहेत. त्यामुळे माझे जामखेड माझी जबाबदारी या संकल्पनेतून खर्डा व जामखेड येथे रक्तदान शिबिर आयोजन केले.
राज्यात १८ वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पुढील दीड ते दोन महिने लस घेतलेल्या नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी लसीकरण आधी युवकांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, असे त्यांनी सांगितले.
जामखेड येथे ४०५ तर खर्डा येथे ८५ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.
---
राेहित पवारांनी केले काैतुक..
आमदार रोहित पवार यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी या उपक्रमासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच यासाठी विविध संघटना, राजकीय पक्ष यांनी एकत्र येऊन रक्तदानासाठी केलेल्या आवाहन बद्दल त्यांचे, आयोजक व रक्तदात्यांचे आभार मानले.
---
०३ जामखेड पोलीस
जामखेड शहरातील महावीर मंगल कार्यालयात पोलीस दलाच्या वतीने आयाेजित रक्तदान शिबिराला आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सूर्यकांत मोरे, प्रा. लक्ष्मण ढेपे.