खंडणी न दिल्याने श्रीरामपूरमध्ये तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 07:13 PM2018-03-04T19:13:18+5:302018-03-04T19:13:43+5:30
श्रीरामपूर शहरात मालमत्ता खरेदी व्यवहाराच्या कारणावरुन १० लाखाची खंडणी न दिल्याच्या कारणावरुन एका तरुणावर तलवारीने वार करुन खून केला तर दुसरा तरुण मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात मालमत्ता खरेदी व्यवहाराच्या कारणावरुन १० लाखाची खंडणी न दिल्याच्या कारणावरुन एका तरुणावर तलवारीने वार करुन खून केला तर दुसरा तरुण मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, आरीफ इब्राहीम मिर्झा (रा. हुसेनगर वार्ड नं.१) याने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि.२) मार्च रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास आरोपी वसीम मेहबूब खान, अब्दुल अश्पाक शेख, जुबेर अश्पाक शेख, फिरोज गफार खान, आयाज अश्पाक शेख, मुजमील बागवान, फरजान फारुख शेख, मौलाना अहमद फारुख शेख(सर्व रा.हुसेननगर, वार्ड नं.१), विशाल हरिषचंद्र लाहुंडे, निलेश शिंदे (रा.सरस्वती कॉलनी, वार्ड नं.७) हे सर्व आरोपी व त्यांची इतर साथीदार सायंकाळी ५ च्या सुमारास फिर्यादी आरीफ मिर्झा याच्या घरी आले व त्यास म्हणाले, तू आम्हाला न विचारता जागा का खरेदी केली? असा जाब विचारला. तू जागा खरेदी केली आता आम्हाला १० लाख रुपये खंडणी दे, अशी मागणी केली. खंडणीचे १० लाख रुपये दिले नाही या कारणावरुन वरील आरोपी, त्यांच्या सहकाºयांनी जीवे मारण्याची धमकी देत माझा भाऊ समीर इब्राहीम मिर्झा याच्या डोक्यावर तलवारीने वार करीत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादीची आई व पत्नी यांना शिवीगाळ करुन घरात घूसून मारहाण करुन घरातील वस्तूंचे व कारचे नुकसान केले.
फिर्यादीचा भाऊ साजीद इब्राहीम मिर्झा यावरही डोक्यावर तलवारीने मारहाण केली. घटनेनंतर दोन्ही जखमींना साखर कामगार हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.रविंद्र जगधने यांनी समीरची प्रकृती चिंताजनक आहे. तर साजीद मिर्झा याचे उपचारापूर्वी निधन झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी तिघा जणांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहे.