बोधेगावची धान्य बँक निराधारांसाठी बनतेय आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:44+5:302021-04-10T04:20:44+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील काही समविचारी युवकांनी पुढाकार घेऊन गावातच धान्य बँक सुरू केली आहे. या माध्यमातून ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील काही समविचारी युवकांनी पुढाकार घेऊन गावातच धान्य बँक सुरू केली आहे. या माध्यमातून गावातील गरजवंत निराधार कुटुंबाला प्रत्येकी २५ किलोचे धान्य मोफत वाटप करण्यात येत आहे. यामुळे संकटकाळात निराधारांसाठी ही धान्य बँक जगण्याचा आधार बनल्याचे पाहायला मिळते आहे.
येथील भगवान फुंदे, प्रवीण भराट, डाॅ. सतीश चव्हाण, राहुल भोंगळे, कुशाबा पलाटे, अमोल कमाने, अप्पासाहेब गायकवाड आदींनी हा उपक्रम सुरू केला आहे. यातून निराधार कुटुंबांना कायम मोफत धान्य देऊ शकणारी आधार धान्य बँक नावाने विधायक अशी संकल्पना साकारली गेली. यासाठी त्यांनी प्रथम स्वखर्चातून प्रत्येकी ५० किलो याप्रमाणे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ आदी धान्य स्वतः बँकेत जमा केले. या उपक्रमाची माहिती मिळताच उमापूर (ता. गेवराई) येथील शिक्षक सुभाष काळे यांनीदेखील धान्याची मदत केली. बँकेत पहिल्याच दिवशी ४०० किलो धान्य जमले. बुधवारी येथील दिव्यांग गंगाराम शामराव पवार, उषाबाई ताराचंद अंधारे आदींना धान्याचे वाटप केले.