वैजापूरमधील शेतविहीरीमध्ये दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 09:19 PM2018-12-29T21:19:14+5:302018-12-29T21:20:03+5:30
पोलिसांनी आसपासच्या गावात मुलांची ओळख पटण्यासाठी चौकशी केली असता ही मुले वैजापूर तालुक्यातील नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
वैजापुर : तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील एका विहिरीमध्ये दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली.
या घटनेतील दोन्ही मुलांचे वय अंदाजे पाच ते सहा वर्षांचे असून अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे हा अपघात कि खून याबाबत तर्कवितर्क होत असून पोलिसही चक्रावून गेले आहेत.
पोलिसांनी आसपासच्या गावात मुलांची ओळख पटण्यासाठी चौकशी केली असता ही मुले वैजापूर तालुक्यातील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील गट क्रमांक २ मध्ये बापुसाहेब कल्याण पवार यांची शेतजमीन आहे. शेतवस्तीपासून दूर अंतरावर विहिर असून विहिरीत जवळपास दोन परस पाणी आहे. शनिवारी सायंकाळच्या वेळी बापुसाहेब पवार यांनी विहिरीत डोकावून बघितले असता दोन लहान मुले पाण्यावर तरंगतांना आढळून आली. पवार यांनी तातडीने पोलिसांनी कळवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागिय पोलिस अधिकारी गौतम पवार, वीरगाव पोलिस ठाण्याचे एपीआय एच.बी.बोराडे, पोलिस नाईक अक्रम पठान, माधव जरारे, एस.के.सरोदे, बिरूटे, बाबासाहेब धनुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक लोकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यातील एकाच्या कपाळावर गंभीर जखम झाली आहे. दोघांना उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे सावखेडगंगा परिसरात खळबळ उडाली आहे.
नगरच्या शाळेतील विद्यार्थी असल्याचा संशय
विहिरीत मृतावस्थेत आढळून आलेल्या मुलाच्या अंगात नगर शहरातील यशश्री प्ले ग्रुप व नर्सरी शाळेचा लोगो असल्याचा शर्ट आहे. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश बोऱ्हाडे यांनी सदरील शाळेचे प्राचार्यांशी फोनवरून संपर्क साधला असता प्राचार्यांनी सध्या शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थ्याची पालकांशी चर्चा करून बेपत्ता असलेल्या मुलांची माहिती पोलिसांना कळवू, असे सांगितले. नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या कार्य क्षेत्रात असल्याने अनोळखी मुलाचा शोध घेण्यासाठी नगर पोलिसाची मदत घेतली जात आहे.