टाकळी कडेवळीत आढळलेला मृतदेह पुण्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:20+5:302021-02-13T04:20:20+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील टाकळी कडेवळीत शिवारातील दिनकर घोडके यांच्या शेताजवळ चार दिवसापूर्वी सापडलेला मृतदेह पुण्यातील असल्याचे सिध्द झाले आहे. ...
श्रीगोंदा : तालुक्यातील टाकळी कडेवळीत शिवारातील दिनकर घोडके यांच्या शेताजवळ चार दिवसापूर्वी सापडलेला मृतदेह पुण्यातील असल्याचे सिध्द झाले आहे. अनैतिक संबंधातून खून करुन खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह टाकळी कडेवळीत शिवारातील जमिनीत पुरला होता. याबाबत अवघ्या चार दिवसात पोलिसांना तपासात धागेदोरे मिळाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.
सोमवारी दुपारी टाकळी शिवारात ५५ वर्षीय इसमाचा शिर नसलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावर पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
मृतदेहाच्या अंगातील कपडे व कोणत्या टेलरने हा शर्ट शिवला आहे. टेलरचा सिम्बाल याबाबत पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला ऑनलाईन माहिती कळविली.
पुण्यातील भारती पोलीस स्टेशनमध्ये १ फेब्रुवारी रोजी एक मिसिंग दाखल होती. ही व्यक्ती मित्राबरोबर बारामतीला जातो असे म्हणून बाहेर पडली. नंतर एका मित्राला बारामतीला न जाता पुण्यात दिसली होती असे समजले. पोलिसांना संबधीत हरवलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ही माहिती दिली. टेलरचा सिम्बाल व शर्ट रंग नातेवाईकांनी ओळखला. ते चार दिवसापूर्वी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.
पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी नातेवाईकांकडे याबाबत विचारपूस केली. मृतदेहाला शिर नव्हते. त्यामुळे पोलीस डीएनए अहवालाशिवाय अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर करणार नाहीत, असे पोलीससूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मुंबई, पुण्याला पथके रवाना केली आहे.