विवाहितेचा मृतदेह गुन्हा दाखल करण्यासाठी आणला पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:50+5:302021-07-01T04:15:50+5:30
सपना सोमनाथ गेठे (वय २४, रा. समनापूर, ता. संगमनेर) या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी तिचे वडील सावळेराम लहानू खेमनर (वय ...
सपना सोमनाथ गेठे (वय २४, रा. समनापूर, ता. संगमनेर) या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी तिचे वडील सावळेराम लहानू खेमनर (वय ४९, रा. हिरेवाडी, साकूर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेचा पती सोमनाथ पांडुरंग गेठे, सासरा पांडुरंग किसन गेठे, सासू सुमनबाई पांडुरंग गेठे, दीर बाळू पांडुरंग गेठे (सर्व रा. समनापूर, ता. संगमनेर) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपना यांचा विवाह संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील सोमनाथ गेठे याच्यासोबत चार महिन्यांपूर्वी झाला होता. सपना या सासरी नांदत असताना त्यांचा पती, सासू, सासरा व दीर या चौघांनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना वेळोवेळी मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला. अंगावरील दागिने काढून घेत ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली. छळाला कंटाळून सपना माहेरी आल्या होत्या.
सोमवारी (दि. २८) सकाळी आठच्या सुमारास त्या घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर बुधवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह हिरेवाडी येथील विहिरीत आढळून आला. मृतदेह बाहेर काढत तो उत्तरीय तपासणीकरिता संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर सपना यांच्या माहेरकडील लोकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट घारगाव पोलीस ठाण्यात आणला. जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत हे अधिक तपास करीत आहेत. सासरा पांडुरंग गेठे याला अटक करण्यात आली आल्याचे तपासी अधिकारी राऊत यांनी सांगितले.