संगमनेरात आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू
By शेखर पानसरे | Published: February 13, 2024 09:03 PM2024-02-13T21:03:58+5:302024-02-13T21:04:07+5:30
ओळख पटू नये म्हणून संपूर्ण अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. ओळख पटू नये म्हणून संपूर्ण अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आला. त्यामुळे चेहरा विद्रूप झाला आहे. ॲसिड टाकल्याचा पोलिसांना संशय आहे. हा मृतदेह मंगळवारी (दि.१३) रात्री ८ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात उड्डाणपुलाखाली आढळून आला.
याबाबत माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलिस कॉस्टेबल आत्माराम पवार हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. मयताची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
मयताच्या गळ्यात रुद्राक्ष माळ असून लांब सफेद दाढी आहे. उजव्या हातात लाल रंगाचा धागा बांधला असून त्यात काळे-पांढरे मणी आहेत. वय अंदाजे ५० असेल. गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ, कामगार पोलिस पाटील गणेश म्हस्के यांनी पाेलिसांना प्राथमिक तपासात मदत केली. असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मथुरे यांनी सांगितले.