तलावाकाठच्या विहिरी बुजवा
By Admin | Published: February 17, 2016 10:33 PM2016-02-17T22:33:18+5:302016-02-17T22:41:26+5:30
शिर्डी : पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने पाणी गळती रोखण्याकरिता साठवण तलावाकाठच्या विहिरी बुजवण्याच्या केलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी,
शिर्डी : पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने पाणी गळती रोखण्याकरिता साठवण तलावाकाठच्या विहिरी बुजवण्याच्या केलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी बुधवारी नगराध्यक्षा अनिता जगताप यांनी प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़
गेल्या आवर्तनापूर्वी शिर्डीला १९ दिवसानंतर पाणी देण्यात आले होते़ शिर्डी शहराला रोज पाणी पुरवठा केला तरी चार महिने पुरेल, इतकी साठवण तलावाची क्षमता आहे़ मात्र, या तलावातून जवळपास ६७ टक्के पाणी गळती होते़
गेल्या वेळी पंचेचाळीस दिवसातच तलाव कोरडा झाला़ त्यातील केवळ सत्तावीस दिवसच पाणी देण्यात आले होते़ जवळपास असणाऱ्या विहिरीतून पाणी उपसा होत असल्याने तलावाची पातळी झपाट्याने खाली जाते़ त्यामुळे महिनाभरापूर्वी या परिसरातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या़विद्युत कनेक्शन कट करण्यात आले होते़ याशिवाय नगरपंचायतनेही तलावाकाठच्या विहिरीच बुजवून टाकाव्या, असा ठराव एकमताने केला आहे़
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा अनिता जगताप, शिवसेनेचे कमलाकर कोते, विजय जगताप, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी आज प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांना भेटून तलावाकाठच्या विहिरी बुजवण्याच्या नगरपंचायतच्या ठरावाची अंमजबजावणी करण्याची मागणी केली़
तलावाकाठच्या विहिरींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला असला तरीही आकडे टाकून किंवा जनरेटरचा वापर करून विहिरीतून पाणी उपसा होत असल्याची तक्रारही यावेळी प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली़ (तालुका प्रतिनिधी)