जामखेड पंचायत समितीसमाेर बोंबाबोंब आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:20+5:302021-04-13T04:20:20+5:30
जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाज बांधवांसाठी मंजूर झालेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे काम तत्काळ सुरू करण्यात ...
जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाज बांधवांसाठी मंजूर झालेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता जामखेड पंचायत समिती समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
यावेळी डॉ. अरुण जाधव म्हणाले, ६ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रा. राम शिंदे मंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली शासन स्तरावर झालेल्या समितीच्या बैठकीत ८८ लाख १० हजार २२३ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. गट नं. ११८६/२ मधील एक हेक्टर जागा अति उच्च दाबाच्या वीज वाहक तारांच्या अडथळ्यामुळे बदलून खर्डा ग्रामपंचायतीने गट नं. ११४१ मधील एक हेक्टर जागा प्रस्तावित करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. नवीन जागेत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीही मिळालेली आहे. नवीन अंदाजपत्रकानुसार अतिरिक्त निधीला मंजुरी मिळाली आहे. खर्डा येथील मदारी समाज बांधवांसाठी राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येणारी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, वंचितचे तालुकाध्यक्ष अतीश पारवे, बाळगव्हाणचे सरपंच राहुल गोपाळघरे, सामाजिक कार्यकर्ते वैजिनाथ केसकर, सनी सदाफुले, मच्छिंद्र जाधव, विशाल जाधव, आजिनाथ शिंदे, गुलाब मदारी, मोहम्मद मदारी, फकिर मदारी, मोहम्मद सय्यद, समशेर मदारी, विशाल पवार, संतोष चव्हाण, सागर भांगरे, राकेश साळवे, भीमराव चव्हाण, राजू शिंदे, बालाजी साठे, द्वारकाताई पवार, आदी उपस्थित होते.
--
पंचायत समिती कार्यालयातून प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जागा बदल आणि इतर समस्यांमुळे कामाला उशीर झाला. त्यामुळे कामाचा खर्च वाढल्याने सुधारित अंदाजपत्रक बनविले आहे. ते समाजकल्याण विभागाकडे पाठविले आहे.
-परसराम कोकणी, गटविकास अधिकारी
--
१२ जामखेड आंदाेलन
खर्डा येथील मदारी समाजाच्या वसाहतीसाठी वंचित बहुजन आघाडीने जामखेड पंचायत समितीसमाेर बोंबाबोंब आंदोलन केले.