बॉम्बपेक्षाही विषमता स्फोटक
By Admin | Published: May 31, 2014 11:34 PM2014-05-31T23:34:07+5:302014-06-01T00:22:10+5:30
अत्याचारविरोधी परिषद : बाबा आढाव यांचे प्रतिपादन
अहमदनगर : राजकीय नेत्यांना लोकांची फक्त मत हवी आहेत. निवडणुकांचा प्रचार ज्या हायटेक पद्धतीने होतो, त्याचपद्धतीने अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी राजकीय मंडळी पुढाकार घेत नाहीत. देशात दहा कोटी म्हातारे आहेत, त्यांची काळजी कोण घेणार? विषमता वाढत राहिली तर जगायचे कसे? विषमता ही बॉम्बपेक्षाही स्फोटक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड बाबा आढाव यांनी केले. सामाजिक न्याय परिषदेतर्फे शनिवारी सहकार सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय अत्याचार विरोधी परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड आढाव बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत विद्याताई बाळ, अॅड. असिम सरोदे, सामाजिक न्याय परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, वाल्मिक निकाळजे, अशोक गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. आढाव म्हणाले, जाती अंताची लढाई सुरू केली का? जात-धर्माबद्दल वैज्ञानिक सत्य नाही म्हणून हे विषय अभ्यासक्रमात कधीच आले नाहीत. राजकारणात जाती अंताचा निर्धार नाही. खर्या इतिहासाचे संशोधन नाही. सरकार बदलले असले तरी सनातनी व्यवस्था त्यांच्याकडे जात आहे. पुतळ््यांच्या उंचीची स्पर्धा लागली आहे. भावनिकेतवर जोर दिला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांगायचा अजेंडा वेगळा आणि छुपा वेगळा आहे. केंद्रात बहुमताने सरकार आले असले तरी यामुळे धर्मनिरपेक्षता, समाजवाद नव्हे तर राज्यघटनाच धोक्यात आली आहेत. त्यांच्या वाट्याला सरकार आणि आमच्या वाट्याला फक्त खैरलांजी-खर्डा हेच आहेत का? असा सवाल आढाव यांनी केला. अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत म्हणून सरकारने अद्याप तरी काहीच केले नाही, असे सांगून आढाव यांनी मोदी सरकारवरही ताशेरे ओढले. विद्याताई बाळ म्हणाल्या, अत्याचाराच्या घटना जरी दुर्दैवी असल्या तरी महाराष्ट्रात नवी पहाट आली आहे. न्याय मिळवायचा असेल तर त्याची भिस्त तरुणांवर आहे. शरद पवार यांच्या जिल्ह्यातच सर्वाधिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांची सामाजिक संवेदना बोथट झाली आहे. सत्तेमध्ये मराठ्यांची मिजास आहे. केंद्रात हिंदुत्त्ववादी बहुमत आहे, त्यामुळे येथून पुढे मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत. जाती अंताच्या लढ्यात सर्वांनाच सक्रीय व्हावे लागेल. वर्णव्यवस्था तर्कसंगत नाही. पुरुष आणि स्त्री यांनी हातात हात घालून घर व समाज चांगला राहील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुलगी शिकते, मुले बेकार राहतात. यामधूनच अत्याचारासारखे प्रसंग घडतात, हे दुर्दैवी आहे. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते भानुदास गजभिव, वाल्मिक निकाळजे, बबनराव वडमारे, मीनाक्षी शिंदे, पंडित कांबळे, सिमांत तायडे यांची भाषणे झाली. अरुण खैरे यांनी परिषदेचे सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)