जिल्हा बँकेचे शाखाधिकारी, सोसायटी अध्यक्ष, सचिव यांनीच काढले बोगस कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 03:09 PM2017-09-06T15:09:58+5:302017-09-06T15:10:06+5:30
श्रीगोंदा : जिल्हा सहकारी बँकेचे मढेवडगाव शाखेचे तत्कालिन शाखाधिकारी, लोणीव्यंकनाथ सेवा सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच संस्थेचे सचिव अशा ...
श्रीगोंदा : जिल्हा सहकारी बँकेचे मढेवडगाव शाखेचे तत्कालिन शाखाधिकारी, लोणीव्यंकनाथ सेवा सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच संस्थेचे सचिव अशा सर्वांनी संगनमताने एका महिलेच्या नावावर बोगस कर्ज काढल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लोणीव्यंकनाथ सोसायटीच्या सभासद वंदना आप्पासाहेब काकडे यांनी दिलेल्या फियार्दीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या फियार्दीत म्हटले आहे, ५ फेब्रुवारी २०१६ कर्ज प्रकरण व चेकवर वंदना काकडे यांच्या खोट्या सह्या करून वरील आरोपींनी ६८ हजाराचे पिक कर्ज काढले़ मी ५ सप्टेंबर रोजी त्या सोसायटीत कर्ज काढण्यासाठी गेल्या असता त्यांच्या नावावर जुनेच कर्ज थकीत असल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे काकडे यांनी थेट श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठून सेवा सोसायटीचे पदाधिकारी, सचिव, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी यांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली़ पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करीत आहेत़
सोसायटीत जागा खरेदी घोटाळा?
सेवा सोसायटीने गोडाऊनसाठी जागा खरेदी केली़ त्यापोटी संस्थेने काही जागा मालकांना पैसे दिले नाहीत पण जागेची खरेदी करुन घेतली़ त्यामुळे काही जागा मालकांनी या खरेदीवरच आक्षेप घेतला आहे़ त्यामुळे ही जागा खरेदी वादाच्या भोवºयात सापडली आहे़ याचा तपास करण्यासाठी सहकार लेखा परीक्षक बुधवारी सोसायटीत दाखल झाले़ त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली असल्याचे सांगण्यात आले़