पुस्तक आणि वाचनवेडा झपाटलेला अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:50 PM2018-09-09T12:50:11+5:302018-09-09T12:50:45+5:30
अलिकडेच माझी भाची तेजल म्हस्के हिच्या विवाहप्रसंगी भारतात आलो होतो
अलिकडेच माझी भाची तेजल म्हस्के हिच्या विवाहप्रसंगी भारतात आलो होतो. माझे मेहुणे संजय म्हस्के व शिवाजी शेळके यांनी त्यांचे गुरू डॉ. भि. ना. दहातोंडे या ग्रंथ व वाचनवेड्या अवलियाची अवर्जुन भेट घडवून आणली. आप्तेष्ट, नातेवाईक व परिवारात ते ‘अण्णा’ या नावाने परिचित. त्यांचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह, वृत्तपत्रे व मासिकांची कात्रणे, दुर्मिळ टिपणे, मासिके अफलातून जाणवले. अफाट स्मरणशक्ती, विनोदी किस्से, ग्रंथामधील संदर्भ, कर्मवीर वि. रा. शिंदे, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज अशा थोर समाजसुधारकांच्या लेखनाने, विचाराने झपाटलेले डॅ. भि. ना. यांची अमृत महोत्सवी वर्षातील लेखन वाचन, मनन, चिंतन याची धडपड पाहून मी अक्षरश: अवाक् झालो. आम्ही सर्वांनी पदस्पर्श करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांच्या सहवासात जाणवलेले पैलू उलगडण्याचा हा अल्पसा प्रयत्न. खास लोकमत वाचकांसाठी थेट अमेरिकेतून.
ठार निरक्षर मातापित्यांच्या पोटी जन्मलेल्या डॉ. भि. ना. दहातोंडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत चिकाटीने, जिद्दीने व कठोर परिश्रमाने शिक्षण पूर्ण केले. यासाठी काही वर्षे भिंगारस्थित बहीण व मेहुणे कै. नाथा यशवंत सपकाळ यांच्याकडे राहिले. तेथेच वाचन, लेखन, टिपणे काढण्याची आवड जोपासली. लेखनिक ते मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक अशी ३० वर्षांची नगरच्या नामांकित महाविद्यालयातील सेवा खूप आनंददायी व समाधानकारक असल्याचे ते म्हणतात़ २००२ मधील निवृत्तीनंतर अखंड वाचन, मनन, चिंतन हा त्यांचा ध्यास वाखणण्याजोगा म्हणावा लागेल. सेवकालात विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळविला. ज्ञानोपासकांना अमेरिकेत निवृत्तीची वयोमर्यादा नाही, असा मी खुलासा केल्यावर ते खूप हसले. ‘महर्षि वि. रा. शिंदे - व्यक्ति आणि विचार’ हा पी. एचडी. प्रबंध मला दाखवून अभिमानाने म्हणाले, १९९२ साली हा प्रबंध प्रकाशित झाला आहे. हल्ली पी. एचडी. प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी-शिक्षकांबद्दल, त्यांच्या दर्जाबद्दल शुद्धलेखनाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शरीराच्या सर्वच अवयवांवर शस्त्रक्रिया होऊनही या अवलियाने वाचन लेखनाच्या वेडापायी आजपर्यंत २१ पुस्तके लिहून स्वखर्चाने प्रकाशित केली आहेत. सर्व पुस्तकांचा संच मला भेट दिला. प्रकाशित केलेली व खरेदी केलेली अफाट ग्रंथ संपदा शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये यांना भेट देऊन विद्यार्थी-शिक्षकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे.
जीवनगौरवासह १२ पुरस्कार मिळूनही हुरळून न जाता व शरीर प्रकृती साथ देत नसतानाही महर्षि वि. रा. शिंदे स्मारक ग्रंथ, स्त्री शक्ती, व्यक्तिचित्रे, सावित्रीबाई व जोतिराव फुले यांच्या जीवनावरील ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी अविरत धडपड चालू आहे. अधूनमधून शाळा महाविद्यालयांमधून उद्बोधक भाषणांचा सपाटाही चालू. प्रसन्न हसरी मुद्रा, विनम्र स्वभाव, लेखन- वाचनाच्या बाबतीमधील उत्साह तरुणांना लाजवेल, असा जाणवला. आळस, मरगळ, अहंकार, गर्व या दुर्गुणांचा लवलेशही त्यांच्या बोलण्यातून जाणवत नव्हता. त्यांची विनयशिलता मला अमेरिकन बंधू- भगिनीसारखी जाणवली. गेली १५-२० वर्षे माझ्या अमेरिकेतील वास्तव्यात मी अनुभवत आहे. डॉ. भि. ना. यांच्या बोलण्यातील सभ्यता, हृदयातील आपलेपणा याला तोड नाही. त्यांची चौकसबुद्धी तर लाजबाब!!
अमेरिका, अमेरिकन्स, त्यांच्या चालीरिती, रूढी, रितीरिवाज, परंपरा, एकूणच जीवनरहाटी अत्यंत उत्कंठतेने व कुतूहलाने जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न मला कौतुकास्पद वाटला. मीही त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करून अमेरिकेला येण्याचा आग्रह धरला़ प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी विनम्रपणे नकार दिला. मीही वाचनवेडा, परंतु ई-पुस्तके वाचतो. म्हणाले, ‘‘ग्रंथांना औषधासारखी एक्सपायरी डेट नसते. ते एका व्यक्तिकडून दुसºया व्यक्तिकडे हस्तांतर करणे सोपे असून एक पुस्तक अनेकजन अनेकवेळा वाचू शकतात. वाचनाने जीवन आनंददायी व प्रेरणादायी होण्यास मदत होते. वाढत्या वयाबरोबर स्वत:च्या मर्यादा सांभाळून माझ्या कुवतीनुसार लेखन वाचन करतो़’’ ते सांगत होते़ निरागस भाव, निर्व्यसनी स्वभाव याला तर तोड नाही. त्यांनी लिहिलेली गोष्टींची पुस्तके पाहून मी म्हणालो, ‘‘काळ कितीही बदलला तरी घरातल्या लहानग्यांना गोष्टी आवडतातच.’’
गप्पांच्या ओघात म्हणालो, ‘‘अमेरिकेसारख्या प्रगत देशातील अनेक गोष्टींचे आम्हा सर्वसामान्य भारतीयांना अतिशय कौतुक वाटते. तथापि पाश्चिमात्य त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथे जिथे आहेत, त्या सगळ्यांचे जतन आणि सर्वंकष संवर्धन करण्यासाठी जी धडपड करतात, एकजूट करतात, सकारात्मक पावले उचलतात त्याबद्दल मात्र आम्ही काहीही बोलत नाहीत. उदासिन जाणवतो. ग्रंथ व्यवहार आणि सजग वाचक हे खरे तर समाजाच्या वैभव संपन्नतेचे एक ठळ्ळक लक्षण समजलं जात. माध्यमांच्या अतोनात वाढलेल्या पसाºयात जीवापाड ग्रंथ जपणारे डॉ.भि.ना. म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे ठरतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
महर्षि वि. रा. शिंदे मँचेस्टर येथे ज्या कॉलेजमध्ये शिकले त्यांच्याशी केलेला पत्रव्यवहार डॉ़ भि़ ना़ यांनी मला आवर्जून दाखविला व प्राणपणाने जपला आहे. एकूणच अमेरिकन वाचनसंस्कृती, ग्रंथालये, त्यांचे जीवनातील सामाजिक महत्त्व तेथील सोयीसुविधा, त्यांची कार्यपद्धती, त्यांचे व्यवस्थापन त्यांची ई-बुक संकल्पना, अमेरिकनाचे वाचनवेड अशा सर्व गोष्टी तपशिलवार माझ्याकडून जाणून घेतल्या. हे वाचनवेडे अवलिया गप्पांच्या ओघात मला म्हणाले, ‘‘पुस्तकासारखा सच्चा मित्र दुसरा कोणीच असू शकत नाही. पुस्तकांतील गुंतवणूक खरी, जिवंत व किफायतशीर असते. पुस्तकांसाठी कितीही व काहीही किंमत मोजण्याची त्यांची तयारी आहे़ कारण पुस्तके दुर्मिळ असे ज्ञानभांडार खुले करतात. म्हणून मी त्यांना प्राणापलिकडे जपतो. कुणाला कशाचा नाद असतो कुणाला कशाचा ! मला वाचन लेखनाचा नाद़ कारण छापिल शब्दांचा परिणाम अधिक गहीरा असतो. व्यायामाची शरीराला, तशी वाचनाशी मनाला नितांत गरज असते़’’ ते म्हणाले.
इंग्रजी भाषा बºयापैकी येताना जाणवले. पाश्चिमात्य लेखकांचे ग्रंथ, पुस्तके वाचण्याची खूप आवड आणि हौस़ पण भाषेच्या मर्यादा म्हणून भाषांतरीत पुस्तके ते वाचतात़ त्यावर टिपणे काढतात़ असा टिपणांचा, कात्रणांचा अफाट संग्रह त्यांनी दाखविला. अमेरिकन कवयित्री सिल्विया प्लाथ यांचे एक टिपण त्यांनी मला दाखविले. त्या म्हणतात, ‘‘मला जितकी वाचायची आहेत तितकी पुस्तके एका आयुष्यात वाचून होणार नाहियेत.’’
दुसरे सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क टेन यांचे एक टिपण दाखविले. ते म्हणतात, ‘‘द ग्रेट बुक्स आर द बुक्स दॅट एव्हरीवन हॅड रेड़ बट नो वन वॉन्टस टू रीड! (चांगले पुस्तक ते की जे प्रत्येकाला वाचावेसे वाटते, पण प्रत्यक्षात कुणीच वाचत नाही.) आपली शंभरी साजरी करण्याचा योग येवो अशी मनोकामना व्यक्त करून आम्ही त्यांचा निरोप घेतला. अधूनमधून त्यांच्या वाचन- लेखन व्यसंगाची, प्रकृतीची फोनवर विचारपूस करतो. परंतु त्यांची ऐकण्याची समस्या आमच्या मनमोकळ्या संवादात अडथळा ठरते. निरामय निरोगी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा!!
लेखक - जयंत लक्ष्मण सादरे
(लेखक अमेरिकास्थित इंजिनिअर आहेत.)