महापालिकेतील बूटफेक प्रकरण : अनिल राठोड न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 02:50 PM2019-08-02T14:50:50+5:302019-08-02T14:54:41+5:30
महापालिकेच्या अभियंत्यावर बूट फेकल्याप्रकरणी आरोपी असलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड गुरूवारी स्वत:हून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाले.
अहमदनगर : महापालिकेच्या अभियंत्यावर बूट फेकल्याप्रकरणी आरोपी असलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड गुरूवारी स्वत:हून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात
हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांचा मुक्काम सध्या उपकारागृहात आहे.
बोल्हेगाव फाटा येथील रस्त्याचे काम रखडल्याने शिवसेना नगरसेवकांनी मे महिन्यात मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात आंदोलन केले होते. यावेळी अनिल राठोड हेही उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिवसेनेचा कार्यकर्ता मदन आढाव याने शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट भिरकावला होता. याप्रकरणी अभियंता सोनटक्के यांनी तोफखाना पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून राठोड यांच्यासह शिवसेना नगरसेवक, कार्यकर्ते अशा १५ ते २० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यानच्या काळात राठोड यांच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता, मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.
दरम्यान, गुरूवारी राठोड स्वत:हून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांच्यासमोर हजर केले. पोलिसांनी सखोल चौकशीसाठी राठोड यांना पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीचे वकील अॅड. विश्वासराव आठरे यांनी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने राठोड यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राठोड यांच्या वतीने लगेच जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील पी. ए. कुलकर्णी यांनी आक्षेप घेत या गुन्ह्याचा तपास होणे बाकी असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यामुळे राठोड यांची रवानगी उपकारागृहात (सबजेल)मध्ये करण्यात आली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे राठोड यांना गुरुवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.