सभापतीपदी बोरुडे, उपसभापतीपदी चोपडा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:12+5:302021-09-15T04:26:12+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी एकही अर्ज ...
अहमदनगर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे सभापतीपदी सेनेच्या नगरसेविका पुष्पा बोरुडे यांची, तर उपसभापतीपदी मीना चोपडा यांची बिनविरोध निवड झाली आहे. अधिकृत घोषणा बुधवारी होणाऱ्या विशेष सभेत केली जाणार आहे.
महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीसाठी बुधवारी विशेष सभा होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंतची मुदत होती. सभापतीपदासाठी सेनेच्या बोरुडे, तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या चोपडा यांचा सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे सभापती पदी बोरुडे यांची, तर उपसभापतीपदी चोपडा यांची बिनविरोध निवड झाली आहे. समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे काम पाहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत बुधवारी महापालिकेत सभा होणार असून, या सभेत बोरुडे व चोपडा यांच्या नावाची घोषणा केली जाईल.
.......................................
भाजपचा विरोध मावळला
महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणाऱ्या भाजपने महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीतून सपशेल माघार घेतली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी काँग्रेसकडूनही अर्ज दाखल केला गेला नाही. त्यामुळे ही समितीही सेना व राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार आहे.