बॉस्कोचे कोविड सेंटर सर्वसामान्यांसाठी ठरले वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:19+5:302021-05-31T04:16:19+5:30
अहमदनगर : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतही रुग्णसेवा देणारे केडगाव येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे कोविड केअर सेंटर सर्वसामान्यांसाठी वरदान ...
अहमदनगर : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतही रुग्णसेवा देणारे केडगाव येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे कोविड केअर सेंटर सर्वसामान्यांसाठी वरदान ठरले. या कोविड सेंटरमधून दोन महिन्यात ३७७ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती संस्थेचे संचालक फादर जॉर्ज यांनी दिली.
मागील वर्षापासून बॉस्को ग्रामीण विकास केंद्र कोरोनाच्या संकटकाळात वंचित व दुर्बल घटकांना आधार देण्याचे कार्य करीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्यांची गरज ओळखून महापालिकेच्या सहकार्याने संस्थेच्या केडगाव येथील कार्यालयात ६५ बेडचे नि:शुल्क कोविड केअर सेंटर एप्रिलमध्ये सुरु करण्यात आले. सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना उपचारासाठी जागा शिल्लक नसताना, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे कोविड सेंटर ग्रामीण भागातील नागरिकांचे आधार बनले आहे. सध्या या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
या कोविड सेंटरमध्ये दिवसाची सुरुवात संगीतमय प्रार्थनेने होते. त्यानंतर रुग्णांना सकारात्मक माहिती देऊन निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचे धडे दिले जातात. त्यानंतर नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणात रुग्णांना सकस आहार दिला जातो. दिवसातून तीन वेळा डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात. रुग्णांच्या मनोरंजनासाठी कोविड सेंटरमध्ये विविध खेळाचे साहित्य देखील पुरविण्यात आले आहे. नगर-पुणे महामार्गावर केडगाव हद्दीत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहे.
---------------------
कोरोना झालेल्या सर्वसामान्य व दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे रुग्णांची योग्य काळजी घेऊन त्यांना लवकर बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
-फादर जॉर्ज, संचालक, बॉस्को ग्रामीण विकास केंद्र
---------------------
सेंटरमध्ये रुग्णांना घरासारखे वातावरण
निसर्गरम्य मोकळ्या वातावरणात असलेल्या बॉस्को संस्थेच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना घरासारखे वातावरण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जेव्हा नातलग जवळ येण्यास घाबरत होते. तेव्हा या संस्थेने रुग्णांना जवळ केले. संकटकाळात ही संस्था देवदूताप्रमाणे मदतीला धाऊन आली. या कोविड सेंटरमध्ये प्रेमाची वागणूक व घराप्रमाणे वातावरण मिळाल्याने लवकर बरे होता आले. ही मदत आयुष्यभर विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया या सेंटरमधून बरे झालेल्या रुग्णांनी व्यक्त केली आहे.