आढळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 05:03 PM2020-02-05T17:03:00+5:302020-02-05T17:05:32+5:30
अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी बुुुुधवारी सकाळी दोन्ही कालव्यांतून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडले आहे.
गणोरे : अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी बुुुुधवारी सकाळी दोन्ही कालव्यांतून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडले आहे.
प्रारंभी उजव्या कालव्यातून ३० व डाव्या कालव्यातून २० क्युसेक दाबाने पाणी सोडले होते. गरजेनुसार पाण्यात वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र, प्रत्यक्षात शेतक-यांकडून पुरेशा प्रमाणात अधिकृत पाणी मागणीचे अर्ज पाटबंधारे विभागाकडे जमा झालेले नाहीत. आढळा धरणाची पाणी साठवण क्षमता एक हजार ६० दशलक्ष घनफूट आहे. बुधवारी आवर्तन सोडताना ९९५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता.
चार हजार हेक्टरसाठी पाणी मागणी
आढळा धरणाखाली तीन हजार ९१४ हेक्टर सिंचनक्षेत्र आहे. मात्र, शेतक-यांकडून फक्त सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याच्या मागणीची अधिकृतपणे नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. गेल्या रब्बी हंगामात धरण अर्धेच भरले असताना शेतक-यांनी एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी केली होती. यंदा आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात पाणीदार परिस्थिती आहे. अद्याप शेतक-यांना पाणी टंचाईची चिंता नसल्याने पाण्याच्या मागणीची घाई दिसून येत नाही.