मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:02 PM2020-01-22T18:02:58+5:302020-01-22T18:03:40+5:30
मुळा धरणातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.
राहुरी: उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्यातून ७०७ क्युसेकने तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात २५ हजार १८७ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ४० दिवसात ३ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. रब्बी व उन्हाळी असे प्रत्येकी एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. उजव्या कालव्याखाली १० हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. याशिवाय डाव्या कालव्याखाली अडीच हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मागे मुळा धरणाून खरिपासाठी एक आवर्तन सोडण्यात आले होते. शेतीसाठी ३ हजार दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार आहे. शिल्लक राहिलेले पाणी शेवटच्या टप्प्यात शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यंदा शेतीसाठी पुरेशा प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे. मंत्रिमंडळाच्या निवडीमुळे उशीराने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.