फेरमतदानात दारूची बाटली आडवी

By Admin | Published: July 31, 2016 11:49 PM2016-07-31T23:49:34+5:302016-07-31T23:50:51+5:30

पारनेर : निघोज येथील मळगंगा देवीच्या नगरीत गावात दुसऱ्यांदा दारूबंदीसाठी फे रमतदान झाल्यानंतर सुमारे २ हजार २३६ मते पडून बाटली आडवी झाली.

A bottle of horror in Ferrmatadad | फेरमतदानात दारूची बाटली आडवी

फेरमतदानात दारूची बाटली आडवी

पारनेर : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या नगरीत गावात दुसऱ्यांदा दारूबंदीसाठी फे रमतदान झाल्यानंतर सुमारे २ हजार २३६ मते पडून बाटली आडवी झाली. उभ्या बाटलीला अवघी १६८ मते मिळाली. यामुळे महिलांनी विजयोत्सव साजरा केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाचा हा विजय ठरला आहे
निघोज येथे दारूबंदीसाठी रविवारी फे रमतदान घेण्यात आले. मागील निवडणुकीत गोंधळ झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. म्हणून फेरनिवडणूक घेण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार भारती सागरे यांनी मतदान केंद्रावर कुठलीही अडचण येऊ नये म्हणून नायब तहसीलदार दत्तात्रय भावले, संजय माळी, संजय दिवाण, गटविकास अधिकारी किशोर काळे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांच्यासह मंडलाधिकारी व अधिकारी यांचे पथक तयार करून सर्व पाच मतदान केंद्रांवर सुत्रबध्द पध्दतीने मतदानाचे नियोजन केले होते. मळगंगा विद्यालय, मुलिकादेवी विद्यालय, मोरवाडी जि.प.शाळा, वडगाव गुंड प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र होती.
दारूबंदी चळवळीच्या महिला कांता लंके, सुरेखा लामखडे, छाया लामखडे, शुभांगी लामखडे, सनिषा घोगरे, पूजा रसाळ यांच्यासह महिलांनी प्रत्येक ठिकाणी महिला मतदारांना मतदानास येण्यासाठी व दारूची बाटली आडवी करण्यासाठी आवाहन केले. त्यानुसार महिला ठिकठिकाणी समुहाने बाहेर येत होत्या. दारूबंदीचे कार्यकर्ते बबन कवाद, अमृता रसाळ, प्रशांत वराळ,दत्ता भुकन, डॉ.महेंद्र झावरे, शिवबा संघटनेचे अनिल शेटे यांच्यासह सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच बाबाजी लंके, मोहन कवाद, ज्ञानेश्वर कवाद यांच्यासह प्रत्येक ठिकाणी युवक व महिलांनी संघटितपणे मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले.
(तालुका प्रतिनिधी)
निघोजमध्ये महिलांनी दारूबंदी व्हावी यासाठी खूप संघर्ष केला होता. मतदानामध्ये दारूबंदी झाली हा विजय इतर गावांना दिशादर्शक ठरणार आहे. निघोजमधील महिला व कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
-अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
निघोजच्या दारूबंदीचा निर्णय ऐतिहासिक असून त्यात सर्व महिला, युवक व ग्रामस्थांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याने आता तालुका दारूमुक्त करण्यासाठी बळ मिळणार आहे.
-राहुल झावरे,
जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष
निघोजमध्ये दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी आम्हाला मोठी साथ दिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलेली खंबीर साथ, त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची बैठक घेऊन मतपत्रिकेवर चिन्ह छापण्याचा तातडीने निर्णय घेण्यास भाग पडल्याने विजयी झेंडा फडकवला. सर्व महिला व युवक, सहकारी व प्रसारमाध्यमांचे आभार.
-बबनराव कवाद, दारूबंदी चळवळीचे प्रमुख ,निघोज
दुपारी दोनपर्यंत मतदान झाल्यानंतर निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयात तहसीलदार भारती सागरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू झाली. सुमारे तासाभरात मोजणी पूर्ण झाली. दोन हजार पाचशे वीस महिलांनी मतदान केले. आडव्या बाटलीला दोन हजार २३६ मतदान झाले.तर उभ्या बाटलीला १६८ मते पडली. ११६ मते अवैध ठरली. निकाल जाहीर झाल्यानंतर महिलांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची मुक्त उधळण करीत विजयोत्सव साजरा केला.

Web Title: A bottle of horror in Ferrmatadad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.