बालमटाकळी येथील बालंबिका मंदिरात धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 10:40 AM2017-11-16T10:40:13+5:302017-11-16T10:52:35+5:30
बालमटाकळी गावातील बालंबिका मंदिरात बुधवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी मंदिरातील एक दान पेटी फोडली तर दुसरी पळवून नेली आहे.
बालमटाकळी : शेवगाव तालुक्यातील धार्मिक व राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या बालमटाकळी गावातील बालंबिका मंदिरात बुधवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी मंदिरातील एक दान पेटी फोडली तर दुसरी पळवून नेली आहे.
बालंबिका देवी ही बालमटाकळीचे ग्रामदैवत आहे. परिसरातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी नेहमी येतात़ परिसरातील भव्य मंदिर आणि जागृत देवस्थान अशी या देवस्थानाची ख्याती आहे. त्यामुळे मंदिरात दान देणा-यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाविकांना त्यांचे दान देण्यासाठी दोन दान पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. यातील एक दान पेटी बुधवारी रात्री चोरट्यांनी फोडून त्यातला ऐवज चोरुन नेला. तर दुसरी दानपेटीच चोरट्यांनी पळवून नेली. सकाळी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी सरपंच व ट्रस्टच्या पदाधिका-यांना कळविले. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. दरम्यान बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रातील पोलिसांनी मंदिरातील चोरीची पाहणी केली आहे. सरपंच तुषार वैद्य, ट्रष्टचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे हे फिर्याद देण्यासाठी बोधेगाव पोलीस ठाण्यात जाणार आहेत.
बालमटाकळीनजीक असणा-याच सुकळी गावातील भीमसेन महाराज मंदिरातही बुधवारी रात्री चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, तेथे चोरट्यांना काहीच सापडले नाही.