श्रीगोंद्यातील दोन हजार घरकुलांच्या कामांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:58+5:302021-04-04T04:20:58+5:30
श्रीगोंदा : तालुक्यात महाआवास योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षांत मंजूर झालेल्या ‘ब’ यादीतील ७० कोटींच्या ४ हजार ८४५ घरकुलांपैकी ३ ...
श्रीगोंदा : तालुक्यात महाआवास योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षांत मंजूर झालेल्या ‘ब’ यादीतील ७० कोटींच्या ४ हजार ८४५ घरकुलांपैकी ३ हजार ९० घरकुलांची कामे पूर्ण झाली. मात्र, १ हजार ७४५ घरकुलांच्या कामांना विविध कारणांनी ब्रेक बसला आहे.
ग्रामविकास विभागामार्फत घरकुल योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना मिळण्यासाठी महाआवास अभियान राबविले जात आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना या सर्व योजनांतर्गत गेल्या पंचवार्षिकमध्ये श्रीगोंदा तालुक्यात ४ हजार ८४५ घरकुले मंजूर झाली होती.
यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २२ हजार ६२६ घरे मंजूर झाली. त्यापैकी १ हजार ६०५ पूर्ण झाली. १ हजार २१ घरकुलांची कामे अर्धवट स्थितीत बंद पडली. रमाई आवास योजनेंतर्गत २ हजार ४८ पैकी १ हजार ३७७ घरकुलांची कामे पूर्ण झाली. ६१ घरकुले अपूर्ण आहेत.
शबरी आवास योजनांमधील ११३ घरकुलांपैकी ६६ घरकुले पूर्ण असून ४७ अपूर्ण अवस्थेत आहेत. पारधी आवास योजनेंतर्गत ५८ पैकी ४२ पूर्ण असून १६ घरकुले अपूर्ण आहेत.
घरकुलांची ‘ब’ यादी संपली आहेत. ‘ड’ यादी सुरू झाली. त्यामुळे ‘ब’ यादीतील मंजूर असलेल्या अपूर्ण घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे पंचायत समिती कार्यालयासमोरील मोठे आव्हान आहे.
घरकुल बांधकामासाठी जागा नसलेल्या लाभार्थींना जागा उपलब्ध करणे, अपूर्ण बांधकामे पूर्ण करणे, अनुदान हप्ते तत्काळ लाभार्थींना अदा करणे यासाठी सर्व ग्रामपंचायत पातळीवर सूचना देण्यात आल्या आहेत.
--
‘ब’ यादीतील मंजूर असलेल्या घरकुलांपैकी १ हजार ७४५ घरकुलांची कामे अपूर्ण आहेत. ही कामे आगामी दोन महिन्यांत पूर्ण करून घेण्यासाठी ग्रामसेवक सरपंच आणि पंचायत समिती यंत्रणेने अलर्ट होण्याची गरज आहे. यासाठी अडचण असेल तर माझी मदत घ्यावी. मात्र, घरकुलांची मंजूर यादी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- प्रशांत काळे ,
गटविकास अधिकारी, श्रीगोंदा
---
०३ श्रीगोंदा घरकुल