महामारीतही लाचखोरी जोरात; महसूल सर्वात पुढे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:03+5:302021-05-30T04:18:03+5:30
अहमदनगर : कोरोना महामारीतही जिल्ह्यात सरकारी कार्यालयातील लाचखोरी जोरात सुरू आहे. लाच स्वीकारण्यात महसूल विभाग अव्वल असून त्यापाठोपाठ पोलिसांचा ...
अहमदनगर : कोरोना महामारीतही जिल्ह्यात सरकारी कार्यालयातील लाचखोरी जोरात सुरू आहे. लाच स्वीकारण्यात महसूल विभाग अव्वल असून त्यापाठोपाठ पोलिसांचा क्रमांक लागतो. २०२० या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३२ गुन्हे दाखल केले. यात महसूल विभागातील ९ तर पोलीस खात्यातील ८ जण लाच स्वीकारताना चतुर्भुज झाले आहेत.
गेल्या १५ महिन्यांपासून सर्वत्र कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले आहे. या साथरोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस, महसूल व इतर सरकारी यंत्रणा रात्रंदिवस राबत असताना काही सरकारी नोकर मात्र वरकमाई करण्यातच धन्यता मानत आहेत. बहुतांशी सर्वसामान्य नागरिक अशा लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची तक्रार करत नाहीत. त्यामुळे कुठल्याही सरकारी कामात पैसे कमवण्याचे लाचखोरांना व्यसनच जडले आहे. विशेष म्हणजे लाच स्वीकारल्याप्रकरणी दरवर्षी सर्वाधिक कारवाई ही महसूल आणि पोलिसांवर होते. गेल्या दोन वर्षात नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांपैकी नगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वाधिक जास्त सापळे रचून लाचखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत.
......
कोणत्या वर्षात किती कारवाया
2018-27
2019-32
2020-32
2021-13 (मे पर्यंत)
......
विभागनिहाय लाचखोर
महसूल-९
पोलीस-८
वीज वितरण-३
आरोग्य विभाग-३
पाटबंधारे विभाग-२
शिक्षण विभाग-२
वन विभाग-१
सहकार-१
भूमि अभिलेख-१
राज्य विक्रीकर-१
सहकार-१
.........
लोकसेवकाने लाच मागितल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तत्काळ कारवाईचे नियोजन केले जाते. नागरिकांनी भीती न बाळगता कुठल्याही सरकारी कार्यालयात अथवा कोणी लोकसेवक कोणत्याही कामासाठी लाच मागत असेल तर त्याची तक्रार करावी. तक्रार देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येण्याचीही गरज नाही. फोनवरही तक्रार केली तरी विभागातील अधिकारी थेट तक्रारदाराकडे जाऊन तक्रार नोंदवून घेत पुढील कारवाई करतात.
-हरीश खेडकर, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर