घरे खाली करा! श्रीरामपुरात रहिवाशांना रेल्वेच्या नोटिसा, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा रेलरोकोचा इशारा
By शिवाजी पवार | Published: September 30, 2023 11:06 AM2023-09-30T11:06:42+5:302023-09-30T11:07:36+5:30
Ahmednagar: श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या दौंड मनमाड रेल्वे मार्गालगतच्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने कारवाई मागे घ्यावी अन्यथा रेलरोकोचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
- शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या दौंड मनमाड रेल्वे मार्गालगतच्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने कारवाई मागे घ्यावी अन्यथा रेलरोकोचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या उत्तर आणि दक्षिण बाजूस गेली पन्नास वर्षापासून राहत असलेल्या लोकांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे हजारो लोक बेघर होऊन रस्त्यावर येतील अशी भीती आहे. शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक प्रबंधक एम. पी. पांडे यांना याप्रश्नी निवेदन दिले. रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या प्रशासनाला त्यात साकडे घालण्यात आले आहे.
शहरात पालिकेने येथील लोकांना घरकुले दिली आहेत. अनेकांचे येथे दुकान व्यवसाय सुरू आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाने त्यांना नोटिसा देऊन घरे व दुकाने काढण्यास सांगितले आहे. या लोकांवर अन्याय झाल्यास लवकरच सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सर्वपक्षीय शिष्ट मंडळ भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भाजप शहराध्यक्ष मारुती बिंगले, शिवसेना उबाठाचे सचिन बडधे,भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना जिल्हाध्यक्ष शुभम वाघ, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे, बीआरएसचे समन्वयक प्रवीण फरगडे आदींच्या सह्या आहेत.