एकाच रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या भाऊ- बहिणीचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:52+5:302021-05-20T04:21:52+5:30
श्रीरामपूर : येथील भाऊ व बहिणीचे कोरोनामुळे नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मात्र दोघांचीही एकमेकांशी भेट होऊ ...
श्रीरामपूर : येथील भाऊ व बहिणीचे कोरोनामुळे नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मात्र दोघांचीही एकमेकांशी भेट होऊ शकली नाही. भाऊ-बहिणीच्या ताटातुटीमुळे कुटुंबामध्ये व नातेवाइकांत हळहळ व्यक्त होत आहे.
श्रीरामपूरचे तरुण किराणा व्यापारी हेमंत मनसुखलाल गुगळे यांचे १८ मे रोजी नगर येथे कोरोनावर उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांची सख्खी विवाहित थोरली बहीण अलका सरदारमल शिंगी हिचे सासर नगरमध्ये शिंगी व्यापारी कुटुंबात होते. हेमंत गुगळे ज्या रुग्णालयात उपचार घेत होते, तेथेच अलका शिंगी उपचारासाठी दाखल होत्या. त्यांचे १५ मे रोजी उपचारादरम्यान निधन झाले. रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयात जाता येत नाही व डॉक्टर्स तसेच वैद्यकीय अधिकारी उपचारासंदर्भात नातेवाइकांना माहिती देत नाही. त्यामुळे रुग्णाजवळ कोणालाही थांबता येत नाही. भाऊ-बहीण एका रुग्णालयात उपचार घेत असताना त्या दोघांची शेवटची भेट होऊ शकली नाही. नियतीने दोघांमध्ये नाते तोडले ही एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल.
हेमंत गुगळे हे अत्यंत मनमिळाऊ, गोड स्वभावाचे होते. त्यांचे ग्राहकांशी व परिसरातील नागरिकांशी चांगले संबंध होते. सार्वजनिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. जैन समाजाचे धार्मिक व सर्व कार्यक्रमात सहभाग होता. अलका शिंगी या हेमंत गुगळे यांच्या थोरल्या भगिनी होत्या. त्यांनी सासूरवाडी कुटुंबात सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले व प्रपंच करून माहेरच्या गुगळे परिवाराचा लौकिक वाढविला. त्यांचा धार्मिक व समाजाच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग होता. दोघा भाऊ-बहिणीची शेवटची भेट होऊ शकली नाही. याबद्दल समाजात, व्यापाऱ्यांत, बाजारपेठेत हळहळ व्यक्त केली जात आहे.
----------