दिराची भावजयसोबत लग्नगाठ, वहिनीला आधार देत चिमुकलीसाठी बनला 'बापमाणूस'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 09:55 AM2022-02-03T09:55:07+5:302022-02-03T09:57:42+5:30
कोरोनाने मोठा भाऊ हिरावला गेला. त्याच्या पश्चात २३ वर्षीय भावजय आणि तिची १९ महिन्यांची चिमुकली दुःखात लोटले गेले
अकोले : एका लग्नाची दुसरी गोष्ट आपण ऐकली आणि पाहिलीही असेल. पण, एका लग्नाची संवेदनशील गोष्ट अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली. भावाच्या निधनानंतर वहिनी आणि पुतणीचं पालकत्व स्विकारणाऱ्या भावाचा आदर्श लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याची सध्या तालुक्यात चर्चा रंगली आहे. भावाचा मोठेपणा, वहिनीचा सामंजस्यपणा आणि कुटुंबीयांनी दाखवलेली समजूतदारी यामुळे हा लग्नसोहळा भावाच्या निधनाचे दु:ख काही काळ बाजूला सारत आनंदी वातावरणात पार पडला.
कोरोनाने मोठा भाऊ हिरावला गेला. त्याच्या पश्चात २३ वर्षीय भावजय आणि तिची १९ महिन्यांची चिमुकली दुःखात लोटले गेले. या कुटंबातील समाधान याने मनाची हिम्मत बांधत आपल्या चिमुकल्या पुतणीचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. चुलते, वडिल आणि सहविचाराने भावजयीबरोबर लग्नगाठ बांधली. रविवारी ३० जानेवारी रोजी म्हाळादेवी येथील खंडोबा मंदिर प्रांगणात हा लग्नसोहळा पार पडला. विधवा वहिनीसोबत लग्न करुन दीराने समाजात भान जपले. तालुक्यातील ढोकरी येथील निलेश कारभारी शेटे (31) यांचे 14 ऑगस्ट 2021 रोजी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन झाले. ते हिरपाडा, जव्हार येथे आश्रमशाळेत सेवेत होते. आश्रमशाळेतील मुले, शिक्षक कोरोनाबाधित झाले. त्यात निलेश यांनाही कोरोनाची बाधा झाली. कोरोनातून सावरत असतानाच त्यांच्या मेंदूत गाठ झाली आणि नाशिक येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांची 23 वर्षांची पत्नी पूनम आणि 19 महिन्यांची चिमुकली आणि सर्व कुटुंब दु:खाच्या खाईत लोटले गेले.
या अपघातातून सावरण्यासाठी घरातील समाधान कारभारी शेटे या 26 वर्षीय तरुणाने वहिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे चुलते सीताराम शेटे, सामाजिक कार्यकर्ते माधव तिटमै, भाऊ मंगेश शेटे, पुनमचे माहेरकडील टाहाकारी येथील एखंडे कुटुंब यांनी सकारात्मक विचार केला.
विधवा मुलीची व सर्व कुटुंबाची मानसिकता तयार केली. रविवारी (दि. ३० जानेवारी) जानेवारी २०२२ ला हा विवाह योग जुळून आला. म्हाळादेवी खंडोबा मंदिर प्रांगणात हा लग्न सोहळा पार पडला.
प्रांगणातच पार पडला लग्न सोहळा
प्रांगणात कोरोना नियम पाळत हा लग्न सोहळा पार पडला. विधवा वहिनीबरोबर कारभारी शेटे (वय ३१) यांचे १४ ऑगस्ट या आघातातून सावरण्यासाठी सोहळा पार पडला.