श्रीगोंदा तालुक्यात संपत्तीसाठी भावानेच केला चिमुकल्या भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:36 AM2018-02-09T11:36:44+5:302018-02-09T11:43:12+5:30
संपत्तीसाठी मोठ्या भावानेच चिमुकल्या भावाचा खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील भाऊ, भावजय व सासूला पोलीसांनी गुरुवारी (८ जानेवारी) अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : संपत्तीसाठी मोठ्या भावानेच चिमुकल्या भावाचा खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील भाऊ, भावजय व सासूला पोलीसांनी गुरुवारी (८ जानेवारी) अटक केली आहे. लालासाहेब बापू पारखे (वय - २७ वर्षे) व काजल लालासाहेब पारखे ( वय - २१ वर्षे ) या दोघांनी संगीता अंकुश वरपे (लालासाहेब पारखे याची सासू ) या तिघांना अटक केली आहे. लालासाहेब पारखे याने खुनाची कबुली दिली आहे. ५ वर्षाच्या बाल्या उर्फ वैभव बापू पारखे याचा खून १३ नोव्हेंबर २०१७ रोजी झाला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १३ नोव्हेंबर २०१७ रोजी वैभव बापू पारखे हा घरातून गायब झाला होता. याप्रकरणी दुपारी अपहरण झाल्याची फिर्याद वडील बापू पारखे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर तब्बल तेरा दिवसांनी चिमुकल्या वैभवचा मृतदेह घराच्या बाजुलाच सापडला. तपासादरम्यान संपत्तीसाठी वैभवचा खून भाऊ - भावजय व सासूने केल्याचे उघड झाले आहे. वैभवचा मोठा भाऊ लालासाहेब बापू पारखे (वय - २७ वर्षे) व काजल लालासाहेब पारखे ( वय - २१ वर्षे ) या दोघांनी संगीता अंकुश वरपे (लालासाहेब पारखे याची सासू ) हिच्या सांगण्यावरून दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. वैभवच्या तीनही मारेक-यांना पोलीसांनी अटक केली आहे. लालासाहेब पारखे याने खूनाची कबुली दिली आहे. तुम्हाला जमीन कमी असल्यामुळे लहान भावाला संपविण्याचे सासूने सांगितल्याचेही त्याने पोलीस तपासात सांगितले. त्यानुसार लालासाहेब व त्याची पत्नी काजल या दोघांनी वैभवचा खुन करण्याचा प्लॅन केला. १३ नोव्हेंबर रोजी वैभव शाळेतून घरी आला होता. त्यानंतर दुपारी झोपेत असताना दोघांनी वैभवचा खून करुन प्रेत घरामागील काटवनात फेकून दिले. रक्तमय झालेले कपडे अर्धवट स्थितीत जाळून खड्ड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जमिनीच्या हिस्यावरुन हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी या खूनाचा छडा लावला.