अहमदनगर महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी बसपाचे मुदस्सर शेख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:06 PM2019-03-04T12:06:26+5:302019-03-04T12:11:24+5:30
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी बहुजन समाज पक्षाचे मुदस्सर शेख यांची आज निवड झाली. शेख यांना भाजपाने पुरस्कृत केले होते.
अहमदनगर - महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी बहुजन समाज पक्षाचे मुदस्सर शेख यांची आज निवड झाली. शेख यांना भाजपाने पुरस्कृत केले होते. भाजपा-राष्ट्रवादी-बसपा अशी आघाडी महापालिकेत कायम राहिली. त्यामुळे शिवसेनेचा पराभव झाला.
१६ सदस्य असलेल्या स्थायी समितीच्या सभागृहात शेख यांना भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा या पक्षाच्या एकूण १० जणांनी मतदान केले. शिवसेनेचे योगिराज गाडे यांना शिवसेनेची सर्वच्या सर्व ६ मते मिळाली.
महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपाने बसपाचे शेख यांना पुरस्कृत केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविनाश घुले यांनी उमेदवारी दाखल केली होती. भाजप-शिवसेनेचे जुळले नसल्याने शिवसेनेने नगरसेवक योगिराज गाडे यांना मैदानात उतरविले. गाडे हे सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे चिरंजीव आहेत. गाडे यांनी भाजपासोबत युती करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. महापौर बाबासाहेब वाकळे यांना शेख यांच्यासाठी राष्ट्रवादीचे समर्थन मिळविण्यात यश आले. त्यामुळे राष्ट्रवादीचे घुले यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे शेख (बसपा) आणि गाडे (शिवसेना) यांच्यात थेट लढत झाली. १६ सदस्यांच्या सभागृहात शेख यांना १० मते मिळाली, तर गाडे यांना ६ मते मिळाली.
जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत निवडणूक पार पडली. महापालिकेत सध्या राष्ट्रवादी व बसपाच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आधीच शब्द दिले असल्याने बसपाला सभापती पद दिल्याचा दावा भाजपाने केला आहे.