लोकसभेसाठी पक्ष बांधणी करणार
By Admin | Published: April 26, 2016 11:18 PM2016-04-26T23:18:54+5:302016-04-26T23:25:21+5:30
अहमदनगर : दक्षिण नगर जिल्ह्याला महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसने संधी दिली आहे. आता कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी दक्षिण लोकसभा व जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.
अहमदनगर : दक्षिण नगर जिल्ह्याला महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसने संधी दिली आहे. आता कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी दक्षिण लोकसभा व जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. दक्षिण लोकसभा मतदार संघातून, सुशिक्षित उमेदवार काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देईल, असा विश्वास प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस नंदकमार झावरे यांनी केले. दुष्काळात कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन उपक्रम राबविले पाहिजेत, असे ते म्हणाले.
नगर जिल्हा कॉँग्रेस समितीच्यावतीने कॉँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक व प्रदेश समितीवर निवड झाल्याबद्दल नंदकुमार झावरे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सत्कार समारंभानंतर झावरे बोलत होते.
झावरे म्हणाले, कॉँग्रेसचे सरकार असताना सरकारने दुष्काळात मागेल त्याला छावणी, शेतकऱ्यांना सुमारे शंभर कोटी रुपयांचा पीक विमा, नांगरणीसाठी अनुदान दिले. माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला पण कॉँग्रेस कार्यकर्ते सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचू शकले नाहीत. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. जनतेत युती सरकारविषयी नाराजी आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेत पोहचले पाहिजे. दक्षिण लोकसभा मतदार संघातून तरूण, सुशिक्षित, उमदेवार पक्षा विजय निश्चित करून देईल, असा विश्वास व्यक्त करून कॉँग्रेसला चांगले दिवस येतील, असा आशावाद झावरे यांनी व्यक्त केला.
सत्तेत असूनही सेना आक्रमक आंदोलन करते. कॉँग्रेस विरोधात असूनही आंदोलने करत नसल्याची खंत दादा पाटील शेळके यांनी व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे म्हणाले, दक्षिण व उत्तर जिल्ह्यातही दुष्काळ आहे. कॉँग्रेसच्या पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दुष्काळ प्रश्नावर आंदोलने केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ प्रश्नावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णा शेलार, जिल्हा युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष हेमंत ओगले, विनायक देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष सविता मोरे, जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल झावरे, राजेंद्र नागवडे यांनी दुष्काळ प्रश्नावर कॉँग्रेसने आवाज उठविण्याची मागणी केली.
अरुण होळकर, बांधकाम समितीचे सभापती बाबासाहेब दिघे, संपतराव म्हस्के, मारुती रेपाळे, पारनेर तालुकाध्यक्ष भास्कर शिरोळे, रामचंद्र मांडगे, एकनाथ पठारे, बापूराव होळकर, संदीप वराळ, बबन झावरे, महेश शिरोळे आदी उपस्थित होते.