नेवाशातील पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:36 PM2017-12-18T13:36:29+5:302017-12-18T13:40:00+5:30
नेवासा परिसरात एकमेव असणा-या पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आली आहे. फर्निचरही कुचकामी झाले असून, भिंतींना तडे गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या विश्रामगृहाला गळती लागत आहे. याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे विश्रामगृह केंव्हाही कोसळू शकते, अशी अवस्था झाली आहे.
सुहास पठाडे
नेवासा : नेवासा परिसरात एकमेव असणा-या पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आली आहे. फर्निचरही कुचकामी झाले असून, भिंतींना तडे गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या विश्रामगृहाला गळती लागत आहे. वापरण्यास अयोग्य झालेल्या या विश्रामगृहाच्या दुरावस्थेबाबत स्थानिक प्रशासनाने वरिष्ठांकडे वारंवार दुरुस्तीचा तगादा लावला. मात्र, याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे विश्रामगृह केंव्हाही कोसळू शकते, अशी अवस्था झाली आहे.
नेवासा ते नेवासाफाटा मार्गावर पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह आहे. ३२ वर्षापूर्वी हे अद्ययावत विश्रामगृह उभारण्यात आले होते. अनेक महत्वाच्या व्यक्तींची येथे उठबस होत होती. त्यामुळे कायम गजबजलेले हे विश्रामगृह एकेकाळी तालुक्याच्या विविध घडामोडींचे केंद्रबिंदू ठरले होते. परंतू गेल्या तीन-चार वर्षांपासून या इमारतीच्या देखभालीकडे कानाडोळा झाल्याने इमारत मोडकळीला आली आहे.
इमारतीतील फर्निचरची पूर्णत: वाट लागलेली आहे. पावसाळ्यात छताला गळती लागते़ भिंतींना तडे गेलेले आहेत. काही खोल्यांमध्ये निकामी साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे. विज पुरवठा करणा-या वायरी अस्ताव्यस्त लोंबकळून शॉर्ट सर्कीटचा धोका तयार झाला आहे. किचन खोलीत सुविधा नसल्याने ते देखील खराब परिस्थीतीत बंद पडलेले आहे. एकेकाळी चार ते पाच कर्मचारी येथे कमी पडत होते. आज तेथे येणा-या जाणारांची संख्या रोडावल्याने केवळ एकमेव कर्मचारी या इमारतीच्या अवस्थेकडे हताशपणे पहात जबबादारी पार पाडत आहे.
पाण्याअभावी शौचालये बंद
काही शौचालयाची तर अत्यंत बिकट अवस्था होवून बंद स्थितीत आहेत. पाण्याच्या टाक्या फुटल्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थीत होत नाही. त्यामुळे शौचालये बंद करण्याची नामुस्की ओढावली आहे. इमारतीच्या बाहेरचा परिसर कचराकुंडी झाला आहे. सगळीकडे कचरा साचला आहे. बाहेर पाण्याचे तळे तर आतमध्ये पाणी टंचाई अशी अवस्था झाली आहे. बाहेरच्या दुर्गंधीमुळे विश्रामगृह परिसरात अनारोग्य पसरले आहे.
विश्रामगृह दुरुस्तीचे दोन वर्षात तीन वेळा वरीष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठवले असून पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने या विश्रामगृहाची दुरुस्ती रखडली आहे.
- ओंकार झावरे, उपअभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, नेवासा