डीजेवर कारवाईचा दणका
By Admin | Published: August 30, 2014 11:19 PM2014-08-30T23:19:22+5:302014-09-01T17:23:07+5:30
गणेशोत्सवामध्ये डीजे वाजवू नका, असे आदेश देऊनही त्याचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांच्या नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पहिल्याच दिवशी पोलिसांनी कारवाईचा श्रीगणेशा केला.
अहमदनगर : गणेशोत्सवामध्ये डीजे वाजवू नका, असे आदेश देऊनही त्याचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांच्या नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पहिल्याच दिवशी पोलिसांनी कारवाईचा श्रीगणेशा केला. त्यामुळे मंडळांबरोबर डीजे चालकांचेही धाबे दणाणले आहेत.
श्री गणेश स्थापनेसाठी शहरातून काही मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या. शहरात सहा, तर सावेडीत सहा मंडळांनी पहिल्या दिवशिच्या मिरवणुकीसाठी परवानगी घेतली होती. कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाची या मिरवणुकीवर नजर होती. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पोलीस पेट्रोलिंग करीत असताना शहाजी चौक ते भिंगारवाला चौक या दरम्यान हलवाई गणेश मंडळाची मिरवणूक सुरू होती. या मंडळाने कर्णकर्कश डीजे वाजविला. शांतता क्षेत्रात ४० ते ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा असताना मंडळांनी ६० ते ७० डेसीबलच्या पुढे आवाजाची पातळी वाढविली. त्यामुळे कोतवालीचे पोलीस नाईक विकास खंडागळे यांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष तेजस सतीश गुंदेचा, मंडळाचे सदस्य अभिनव प्रकाश सूर्यवंशी (दोघे रा. हलवाई गल्ली), डीजेचे मालक आकाश देवराज शेट्टी (रा. कोंढवा, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांनी डीजेबंदीबाबत जारी केलेले आदेश, पर्यावरण संरक्षण कायद्याप्रमाणे आवाजाच्या पातळीचे केलेले उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मिरवणुकीत वापरण्यात आलेले वाहन विनाक्रमांकाचे होते. त्यामुळे मोटार वाहन कायद्याप्रमाणे विनापरवाना ट्रॅक्टर वापरल्याविरुद्ध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या मंडळाने मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. कोतवालीचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण काळे, सहायक पोलीस निरीक्षक भारत जाधव यांच्या पथकाने कारवाई केली. तसेच डीजेही जप्त केला. कोतवाली पोलिसांनी गेल्या आठ दिवसांपासून डीजे चालक, मंडळांना नोटिसा बजावून डीजे लावल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्याचा चांगला परिणाम पहिल्याच दिवशी पहायला मिळाला.
तोफखाना हद्दीत दोन मंडळाच्या मिरवणुकीत डीजे वाजविल्याने दोन मंडळांच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यातील गोपणीय शाखेचे राजेंद्र प्रभाकर गर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन राजेंद्र आलेचेट्टी (रा. तोफखाना), शब्बीर शेख, दिलीप राजा बनसोडे, जावेद अली शेख (सर्व रा. दत्तवाडी, पुणे) यांच्याविरुद्ध पोलीस अधिक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पुण्याच्या दोघांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. तोफखाना हद्दीत जंगुभाई तालीमच्या सिद्धेश्वर गणेश मंडळाने काढलेल्या मिरवणुकीतही डीजे वाजवून ध्वनिपातळीचे उल्लंघन केल्याचे पोलिसांना आढळून आले. तोफखाना पोलीस ठाण्याचे शब्बीर शेख यांच्या फिर्यादीवरून राजू दत्तात्रय जाधव (रा. तोफखाना) आणि डीजे चालक सागर विजय कांबळे (पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान एका लोकप्रतिनिधीने प्रोत्साहन दिल्यानेच डीजेचा आवाज वाढल्याचे पोलीस सांगत आहेत. (प्रतिनिधी)
डीजे लावून नियमांचे उल्लंघन केल्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेले तेजस सतीश गुंदेचा हे विद्यमान नगरसेविका मंगला गुंदेचा यांचे पुत्र आहेत. राजू जाधव हे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचे काका असून ते फरार आहेत. ४डीजेप्रकरणी अटक केलेल्या चौघांना प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना दहा हजार रुपयांची सुरक्षा रक्कम भरून जामिनावर मुक्त करण्यात आले.
यातील डीजेचालक कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मण काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
यावर्षीच्या गणेशोत्सवात डीजे बंद म्हणजे बंद, असे आदेशच पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांनी दिले होते. त्यामुळे पोलिसांनी पहिल्याच दिवशी कारवाई करून डीजेवर नियंत्रण मिळविले आहे. डीजे वाजविल्यास कोणाचीही तमा न बाळगता कारवाई सुरू राहील, असे उपविभागीय पोलीस अधिकारी वाय.डी. पाटील यांनी सांगितले.