कोतूळ ग्रामीण रुग्णालयाचा भार दोनच डॉक्टरांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:23+5:302021-04-17T04:19:23+5:30
मच्छिंद्र देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क कोतूळ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा महिने डाॅक्टरच नाही, तर ग्रामीण रुग्णालयात चारपैकी ...
मच्छिंद्र देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
कोतूळ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा महिने डाॅक्टरच नाही, तर ग्रामीण रुग्णालयात चारपैकी केवळ दोनच डाॅक्टर चाळीस गावांचा भार पाहतात. एखाद्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास शवविच्छेदनासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागते. अतिरिक्त कामाचा ताण आणि असंख्य रुग्ण, यामुळे पाच दिवसांपूर्वी कोरोनाने डाॅ.देविदास लव्हाटे यांचा सरकारी अनास्थेने बळी घेतला. यापूर्वीही एका डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
कोतूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे जिल्हा उपरुग्णालयात रूपांतर करण्याची घोषणा आमदार डाॅ.किरण लहामटे यांनी केली. मात्र, लोकप्रतिनिधींना इथली वस्तुस्थिती माहिती आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोतूळ ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात स्वतः आमदार लहामटे यांचा सातेवाडी व कोतूळ असे दोन जिल्हा परिषद गटात येतात. या गटात किमान पन्नास लहान, मोठी गावे आहेत.
सहा वर्षांपूर्वी झालेली अलिशान इमारत, शल्यचिकित्सा, एक्स-रे, कुटुंब नियोजन, प्रयोगशाळा, डिलीव्हरी रूम, तीस बेड, शवविच्छेदन कक्ष कर्मचाऱ्यांना अलिशान निवासस्थाने अशा सुविधा आल्या. दररोज सुमारे शंभर रुग्ण उपचार घेतात. चार वैद्यकीय अधिकारी आवश्यक असताना दोन वर्षांपूर्वी केवळ एकच वैद्यकीय अधिकारी होता. सध्या एक वैद्यकीय अधिकारी श्रेणी १ व एक श्रेणी २ चे कंत्राटी पद्धतीने काम पाहतात. कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात कामाचा ताण जास्त असल्याने इथे रात्रंदिवस काम करावे लागते. त्यात सर्प, विषबाधा, अपघात याचे धोकादायक रुग्ण आल्यास कमी मनुष्यबळामुळे गावपुढारी व नातेवाइकांच्या रोषाला बळी पडावे लागते.
अकोले तालुक्यात कोरोना केंद्रावर राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू आहे.
....
खासगी डॉक्टरांकडे रांगा
कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात कोवीड केअर सेंटर सुरू असल्याने उपचारासाठी अकोलेत जाण्याचा अजब आदेश निघाला आहे. त्यामुळे गोरगरीब आदिवासी व सामान्य जनतेला खासगी डाॅक्टरांच्या दारात रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला हा भुर्दंड बसत आहे.
...
कोटही आवश्यकता आहे