घरफोडीच्या गुन्ह्याची झाली उकल, तीन गुन्हे उघड; आठ तोळे सोने हस्तगत, दोघांना अटक
By शिवाजी पवार | Published: April 24, 2024 06:07 PM2024-04-24T18:07:23+5:302024-04-24T18:11:20+5:30
या प्रकरणी प्रसाद गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली होती.
शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): श्रीरामपूर शहरातील घरफोडी प्रकरणात दोघा सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. यात २ लाख ६८ हजार रुपयांचे ८ तोळे सोने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे. या प्रकरणी प्रसाद गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यावरून सर्फराज उर्फ सफ्या बाबा शेख (वय २० वर्षे, रा. बिफ मार्केटजवळ), सोने कारागीर सैफुद्दीन नजरुल इस्लाम उर्फ राजू बंगाली याला ताब्यात घेतले आहे.
शहरात १० एप्रिलला एका धार्मिक कार्यक्रमासाठी प्रसाद गायकवाड व त्यांची आई स्वाती गायकवाड घराला कुलूप लावून गेलेले होते. दुपारी परतले असता त्यांना असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील दोन्ही कपाट उघडलेले होते. त्यामधील कपडे व सामना अस्ताव्यस्त पडलेले दिसले व कपाटामध्ये ठेवलेले ४० हजार रोख रक्कम व साडेतीन तोळे सोन्याचे दागिणे गायब झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. त्यांनी सुरवातीला फायनान्स कंपनीकडून सोने कर्ज घेतल्याची कबुली दिली. नंतर सोने प्रकाश पोपटराव बोकन यांच्या मदतीने फायनान्स कंपनीतून सोडवून घेतल्याचे त्यांनी सांगितले. सोने वितळून त्याची ३२ ग्रॅम वजनाची लगड बनवली. प्रकाश बोकन याच्याकडून १ लाख ८४ हजार रुपयांची ३२ ग्रॅम वजनाची लगड जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडून शहरातील तीन गुन्हे उघड करण्यात आले आहेत. २ लाख ६८ हजार ३०० रूपये किमतीचे ८ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके करीत आहेत.