निम्म्या नगर तालुक्याची तहान भागवणारी बुऱ्हाणनगर योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:19 AM2021-03-18T04:19:42+5:302021-03-18T04:19:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव : जवळपास निम्म्या नगर तालुक्याची तहान भागवणारी बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत सापडली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : जवळपास निम्म्या नगर तालुक्याची तहान भागवणारी बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत सापडली आहे. महावितरणने या योजनेतील गावांकडे असणाऱ्या ४ कोटींच्या वसुलीसाठी मंगळवारी वीज जोडणी तोडल्याने ही योजना आता ऐन उन्हाळ्यात बंद झाली आहे. या योजनेतील समाविष्ट गावांकडे साडेसहा कोटींची थकबाकी आहे.
नगर तालुक्यातील ४४ गावांची असणारी बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रत्येकवेळी कोट्यवधी रूपयांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत येत आहे. मुळा धरणाजवळ बुऱ्हाणनगर योजना व मिरी-तीसगाव योजनेची एकत्रित वीज जोडणी आहे. या दोन्ही योजनांमध्ये नगर तालुक्यातील ३८, पाथर्डी तालुक्यातील २८ तर राहुरी तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे. या दोन्ही योजनांची वीजबिलाची थकबाकी ४ कोटींच्या घरात गेली आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणने मंगळवारी या योजनांची वीज जोडणी तोडल्याने दोन्ही योजना बंद पडल्या आहेत.
या योजना बंद होऊ नयेत, यासाठी पंचायत समितीने तातडीने पावले उचलत ५० लाख रूपयांचा धनादेश महावितरणकडे जमा केला. मात्र, थकबाकीची आणखी रक्कम भरल्याशिवाय योजनांची वीज जोडणी देणार नाही, असा पावित्रा महावितरणने घेतला आहे.
पंचायत समितीने बुधवारी तातडीने योजनेतील समाविष्ट गावातील ग्रामसेवकांची बैठक घेऊन थकबाकीचा धनादेश भरण्याचे आदेश दिले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांशी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यातच योजना बंद पडल्याने टंचाईची तीव्रता आणखी वाढणार आहे.
दोन्ही योजनांमध्ये तीन तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. वीजबिलाचा भरणा करण्यासाठी गावांच्या संख्येनुसार नगर तालुक्याला ७० टक्के तर पाथर्डी व राहुरी तालुक्याला मिळून ३० टक्के रक्कम असे टप्पे करण्यात आले आहे. नगर तालुक्याने आतापर्यंत १४ कोटी रूपयांचा भरणा केला आहे. मात्र, राहुरी व पाथर्डीमधील थकबाकीमुळे योजनेची आर्थिक अडचण वाढली आहे.
----
पाणीपट्टीची मोठी थकबाकी असणारी गावे...
नागरदेवळे - १ कोटी ९४ लाख
वडारवाडी - ६५ लाख
बारा बाभळी - ३० लाख
बुऱ्हाणनगर - ४४ लाख
खारे कर्जुने- २९ लाख,
खातगाव - २१ लाख
जेऊर - २६ लाख
केतकी - शहापूर - ४८ लाख,
कापूरवाडी - ३३ लाख.
---
शंभर टक्के वसुली असणारी गावे...
दरेवाडी, निमगाव वाघा, उक्कडगाव, टाकळी काझी, पिंपळगाव वाघा, वारूळवाडी आदी गावांची शंभर टक्के वसुली आहे.
---
वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने बुऱ्हाणनगर योजनेचे कनेक्शन बंद केले. यामुळे जी गावे नियमित थकबाकी भरतात, त्यांच्यावरही अन्याय होत आहे. ज्या गावांकडे मोठी थकबाकी आहे, त्यांचा पाणीपुरवठा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
- संदेश कार्ले
अध्यक्ष, घोसपुरी पाणीपुरवठा योजना समिती