बस टँकरचा अपघात : एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 05:45 PM2019-05-08T17:45:06+5:302019-05-08T18:14:09+5:30
शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर शेवगाव-गेवराई राज्य मार्गावर सोनविहीर फाट्यानजीक मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एसटी बस आणी पाण्याच्या टँकरची समोरासमोर जोरदार टक्कर झाली.
बालमटाकळी : शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर शेवगाव-गेवराई राज्य मार्गावर सोनविहीर फाट्यानजीक मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एसटी बस आणी पाण्याच्या टँकरची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. यामध्ये टँकरचा ड्रायव्हर जागीच ठार झाला.
गेवराई आगाराची पुणे-गेवराई ही बस गेवराईकडे जात असतांना बोधेगाव वरून गदेवाडी फाट्यानजिक जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी भरण्यासाठी टँकर जात असतांना समोरासमोर जोरदार टक्कर झाली. त्यामध्ये टँंकरचा ड्रायव्हर दत्तात्रय तुकाराम राजळे (वय ३६ राहणार मठाचीवाडी, ता. शेवगांव) हा जागीच ठार झाला तर बसचा ड्रायव्हर सिताराम चंद्रसेन उघडे रा. खडकी (ता गेवराई) हा गंभीर जखमी झाला आहे. बस मधील प्रवाशी राणी अशोक जाधव (वय २८ रा. गेवराई जि. बीड), नितीन ज्ञानेश्वर एडके (वय २५ रा.धोंडराई ता. गेवराई जि. बीड), सुभाष कोंडीराम लोखंडे (वय ४५ रा .जुने दहिफळ ता. शेवगाव), गोरख अंबादास गुंजाळ (वय ६६ रा. गेवराई . रमेश बाबुराव पवार वय ३४ रा. जातेगाव ता. गेवराई), बाबासाहेब आहेरकर हे प्रवाशी गंभीर जखमी झाले असून शेवगावच्या ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून नगर येथे पाठवण्यात आले असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक परदेशी यांनी दिली.