बसचालकाची बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:24 AM2021-09-22T04:24:27+5:302021-09-22T04:24:27+5:30
संगमनेर (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि. २१) सकाळी ...
संगमनेर (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि. २१) सकाळी साडेसहाच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात मुक्कामी असलेल्या पाथर्डी-नाशिक (एम. एच. १४, बी. टी. ४८८७) बसमध्ये याच बसचा चालक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
सुभाष शिवलिंग तेलोरे (वय ५०, रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बसचे वाहक पोपट साहेबा जावळे (पाथर्डी आगार) यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाथर्डी आगाराची पाथर्डी-नाशिक ही बस संगमनेर मार्गे नाशिकला जात होती. या बसमध्ये डिझेल कमी असल्याने सोमवारी (दि. २०) रात्री चालक-वाहक बस घेऊन संगमनेर आगारात मुक्कामी थांबले. चालक तेलोरे यांनी आगाराच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या असलेल्या एका बसच्या पाठीमागे त्यांच्या ताब्यातील बस उभी केली होती. त्यानंतर चालक तेलोरे आणि वाहक जावळे हे दोघे झोपण्यासाठी गेले. मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तेलोरे त्यांच्या अन्य सहकाऱ्यांसह कामावर जाण्यासाठी तयार झाले. तेलोरे हे सर्वांच्या आधी आगारातून बाहेर पडले. काही वेळाने बसचे वाहक जावळे बसमध्ये आले. त्यावेळी त्यांना चालक तेलोरे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
प्रवाशांना उभे राहताना पकडण्यासाठी बसच्या छताला असलेल्या लोखंडी बारला दोरीच्या साहाय्याने तेलोरे यांनी गळफास लावून घेतला होता. घडलेल्या घटनेबाबत वाहक जावळे यांनी परिवहन महामंडळाच्या इतर कर्मचाऱ्यांना माहिती देत पोलिसांना कळविले. सहायक फौजदार शिवाजीराव फटांगरे बसस्थानकात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केल्यानंतर तेलोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. तेलोरे यांच्या जवळ पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल येशू टोपले अधिक तपास करीत आहेत.
-------------------
मिळालेल्या चिठ्ठीतील मजकूर
चालक सुभाष शिवलिंग तेलोरे यांच्या जवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्यात तेलोरे यांनी पैसे घेतलेल्या सहा जणांची नावे आहेत. ‘एवढे पैसे मी लोकांचे घेतले आहेत. माझ्या एसटीचे पैसे मिळाल्यावर सगळे पैसे देऊन टाकावे आणि तुम्ही दोघा भावांनी विचाराने राहावे. मम्मीला जीव लावणे. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे व राहील. तुम्ही अजिबात घाबरायचे नाही. मी तुम्हाला काहीही तकलीफ होऊ देणार नाही. सगळ्यांना प्रेमाने वागा, कोणाला उलट-सुलट बोलू नये. हिशोब आल्यावर पैसे देतो म्हणावे, असा चिठ्ठीतील मजकूर आहे.
---------------