तालुक्यांच्या ठिकाणांसाठी आता पंधरा मिनिटाला बस
By Admin | Published: May 17, 2016 11:57 PM2016-05-17T23:57:36+5:302016-05-17T23:57:37+5:30
अहमदनगर : प्रवाशांच्या सोयीसाठी १ जुलैपासून ‘तालुका ते तालुका’ व ‘तालुका ते जिल्हा’ अशा एसटी बसच्या नवीन फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन जिल्ह्यात सुरु आहे.
अहमदनगर : प्रवाशांच्या सोयीसाठी १ जुलैपासून ‘तालुका ते तालुका’ व ‘तालुका ते जिल्हा’ अशा एसटी बसच्या नवीन फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन जिल्ह्यात सुरु आहे. यामुळे किमान पंधरा मिनिटे किंवा कमाल अर्ध्या तासाने प्रवाशांना बस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणांहून रात्री आठ-नऊ नंतर अनेक तालुक्यांना जाण्यासाठी बसची सुविधा नाही. यावरही पर्याय योजला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नगरचे विभागीय नियंत्रक अशोक जाधव यांनी सांगितले.
‘प्रशासन ते जनता’ संवाद या ‘लोकमत’च्या उपक्रमात ते बोलत होते. एसटी महामंडळाची स्थापना प्रवाशांना खात्रीशीर, किफायतशीर व सुरक्षित प्रवाशी सेवा मिळण्यासाठी झालेली आहे. त्यासाठीचे सर्व धोरणात्मक निर्णय एसटीचे संचालक मंडळ घेते. नगर विभागाचा विचार केला तर जिल्ह्यात एसटीची सेवा उत्तम आहे.
जिल्ह्यातील ११ आगारांतून एसटीचे काम चालते. जिल्ह्यासाठी ७५० बसगाड्या, १४५० चालक, १४७५ वाहक तसेच ८५० तांत्रिक कर्मचारी वर्ग असा एसटीचा राबता आहे. तरीही अजून अडीचशे चालकांची गरज भासते आहे. ते उपलब्ध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. नवीन १०० चालक मिळाले आहेत. त्यामुळे येत्या जुलैपासून निरंतर बससेवा सुरू होणार आहे. तालुका ते तालुका व तालुका ते जिल्हा असा मार्ग त्यातून जोडला जाणार आहे. या मार्गावर सध्या गाड्या आहेत, परंतु त्यात प्रवाशांचा प्रतिक्षा वेळ कमी करण्यात येणार आहे. एस.टी. जाळे जिल्ह्यात विस्तृत करण्याचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)