दमबाजीला कंटाळून उद्योजकाची नगरमध्ये आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:03 AM2017-12-18T11:03:58+5:302017-12-18T11:04:51+5:30
शेड विकत घेण्यासाठी दोघांकडून होत असलेल्या धमकीला कंटाळून एमआयडीसीतील उद्योजकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली़ रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास शहरातील पारिजात चौकात ही घटना घडली.
अहमदनगर : शेड विकत घेण्यासाठी दोघांकडून होत असलेल्या धमकीला कंटाळून एमआयडीसीतील उद्योजकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली़ रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास शहरातील पारिजात चौकात ही घटना घडली.
बलराज आत्माराम बठेजा (वय ५८, रा. तारकपूर) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. बठेजा यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्यानंतर त्यांचे नातेवाईक अमित बठेजा यांनी तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला.
यावेळी मयत बठेजा यांच्या खिशात त्यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या शीतल इंडस्ट्रिज कंपनीच्या लेटरहेडवर लिहिलेली चिठ्ठी मिळाली. ही चिठ्ठी हिंदी भाषेत असून, त्यावर मयत बठेजा यांची स्वाक्षरी आहे. ‘मी माझ्या शेडच्या डिपॉजिटसाठी एका व्यक्तीकडून एक लाख रुपयांचा चेक घेतला होता. मात्र ज्यांच्याकडून चेक घेतला त्यांच्यासोबत शेडचे अॅग्रीमेंट तयार करावयाचे नव्हते. घेतलेला एक लाखाचा चेक मी सदर व्यक्तीला परत करत होतो. मात्र सदर व्यक्ती आणि त्याचा भाऊ ते चेक परत घेत नव्हते़ मला जबरदस्ती करून दमबाजी करत होते. माझी हालत खराब होती म्हणून मी हा निर्णय घेतला’ असा उल्लेख या चिठ्ठीत आहे.
बठेजा यांनी ज्या व्यक्तीकडून चेक घेतला आहे, त्याच्य व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला असून, त्याचा मोबाईल क्रमांकही लिहिलेला आहे. या घटनेबाबत तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत व्यक्तीच्या कुणी नातेवाईकांनी तक्रार दाखल केली, तर गुन्हा दाखल करणार असल्याचे तोफखाना पोलिसांनी सांगितले.