दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कारमध्येच आवळला गळा; नाल्यात सापडला व्यापाऱ्याचा मृतदेह, २२ दिवसांनी उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:28 IST2025-03-19T12:28:07+5:302025-03-19T12:28:34+5:30
दीपक लालसिंग परदेशी (६८, रा. परदेशी मळा, बोल्हेगाव) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, ते २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. अपहरण करून खून केल्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.

दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कारमध्येच आवळला गळा; नाल्यात सापडला व्यापाऱ्याचा मृतदेह, २२ दिवसांनी उलगडा
अहिल्यानगर : दहा कोटींच्या खंडणीसाठी धावत्या कारमध्ये नायलॉन दोरीने गळा आवळून व्यापाऱ्याचा खून करून मृतदेह रस्त्यालगतच्या नाल्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १७) रात्री उघडकीस आला आहे. दीपक लालसिंग परदेशी (६८, रा. परदेशी मळा, बोल्हेगाव) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, ते २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. अपहरण करून खून केल्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.
किरण कोळपे (३८) व सागर गीताराम मोरे (२८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. परदेशी यांचे तेलाचे दुकान आहे. त्यांचे विळद गावातील काही लोकांकडे पैसे होते. ही वसुली करण्याचे काम त्यांनी आरोपींना दिले होते. परंतु, पैसे वसूल करता आले नाहीत, म्हणून त्यांनी परदेशी यांनाच उचलून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा कट रचला. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोघे आरोपी परदेशी यांच्या घरी आले. त्यांनी परदेशी यांना कारमध्ये बसविले. कोळपे याने त्यांच्याकडे दहा कोटी रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने मोरे याने परदेशी यांचे हात घट्ट पकडले. त्यानंतर त्याने नायलॉन दोरीने परदेशी यांचा गळा आवळला.
कारमुळे लागला छडा
पोलिसांनी परदेशी यांच्या घरापासून जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पांढऱ्या रंगाची कार जाताना दिसली. ही कार दोन ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये दिसल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ही कार कुणाची आहे, याचा शोध घेतला असता ती कोळपे याची असल्याचे समोर आले.
बेपत्ता झाल्याची तक्रार
परदेशी बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाइकांनी २५ फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तपास केला.
परंतु, परदेशी मिळून आले नाहीत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळपे याला अटक केल्यानंतर त्याने मृतदेह दाखविला.
बडतर्फ पोलिसाचे कृत्य
यातील आरोपी किरण कोळपे हा पोलिस खात्यात होता. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याला बडतर्फ करण्यात आलेले आहे. त्यानेच परदेशी यांच्या खुनाचा कट रचला होता.