‘अंनिस’च्या तक्रारीवरुन बुवाबाजी करणारास भेंड्यात रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 07:14 PM2018-01-04T19:14:43+5:302018-01-04T19:18:20+5:30
अंगारे, धुपारे करुन नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी भेंडा (ता. नेवासा) येथील लांडेवाडीतील एका जणास नेवासा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. गुरुवारी दुपारी २ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.
भेंडा : अंगारे, धुपारे करुन नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी भेंडा (ता. नेवासा) येथील लांडेवाडीतील एका जणास नेवासा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ‘अंनिस’च्या तक्रारीवरुन गुरुवारी दुपारी २ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.
अहमदनगर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे भेंडा येथील राजेंद्र बाबुराव काळे (वय ५७) याच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. समितीच्या अॅड. रंजना गवांदे व छाया बंगाळ काही समस्या घेऊन बनावट ग्राहक म्हणून राजेंद्र काळे याच्याकडे गेल्या होत्या. यावेळी काळे याने त्यांना तुम्हाला यावर उपाय करुन देतो, असे सांगून गुरुवारी तोडगा करण्यासाठी पुन्हा बोलावले होते. याबाबत त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली होती. त्यावरुन पोलिसांनी राजेंद्र काळे यास ताब्यात घेतले. यावेळी बुवाबाजी विरोधी समितीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. रंजना गवांदे, चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. बाबा आरगडे, अंनिसचे जिल्हा कार्यवाह प्रा.अशोक गवांदे, अंनिसच्या कार्यकर्त्या छाया बंगाळ, बी.के.चव्हाण, भाऊसाहेब सावंत, पोलीस उपनिरीक्षक हरिभाऊ माळी उपस्थित होते. काळे याच्याविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात बुवाबाजी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.